प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या ३१ जुलै या अंतिम दिवसापर्यंत ऐतिहासिक ६.७ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. ही वाढ तब्बल १६.१ टक्के आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ९४ लाख अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ५३ लाख ७० हजार जणांनी यंदा पहिल्यांदाच विवरणपत्रे दाखल केली आहेत, असे प्राप्तीकर विभागातर्फे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी दिलेल्या मुदतीपर्यंत पाच कोटी ८३ लाख विवरणपत्रे दाखल झाली होती. ज्यांनी अद्याप विवरणपत्रे दाखल केली नाहीत, त्यांनी ती लवकरात लवकर भरावी. म्हणजे त्यांना विलंब शुल्क भरावे लागणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मुंबई- जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील चारही मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर
इथे औरंगजेब नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजच हिरो !
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती ऑफर
विहिरीचं काम सुरू असताना अपघात; चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
आतापर्यंत सुमारे ८५ टक्के म्हणजे पाच कोटी साठ लाख विवरणपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तपासण्यात आली आहेत. अखेरच्या एका दिवसात ६४ लाख ३३ हजारांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली. त्यातील पाच लाख विवरणपत्रे संध्याकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान दाखल झाली. चार वाजून ३५ मिनिटे आणि सहा सेकंदाला सर्वाधिक ४८६ विवरणपत्रे दाखल झाली तर, पाच वाजून ५४ मिनिटांनी सर्वाधिक आठ हजार ६२२ विवरणपत्रे दाखल झाली.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ६.७७ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रांपैकी ४९.१८ टक्के म्हणजेच ३.३३ कोटी विवरणे ही आयटीआर १ अर्जाद्वारे होती. तर, आयटीआय २ अर्ज भरणाऱ्यांची संख्या ११.९७ टक्के म्हणजेच ८१.९२ लाख होती. तर, आयटीआर ३ दाखल करणाऱ्यांची संख्या ११.१३ टक्के म्हणजेच ७५. ४० लाख होती. आयटीआर ४ दाखल करणाऱ्यांची संख्या २६.७७ टक्के म्हणजेच १.८१ कोटी आणि आयटीआर ५ ते ७ दाखल करणाऱ्यांची संख्या ०.९४ टक्के (६.४० लाख) नोंदली गेली. यापैकी ४६ टक्क्यांहून अधिक विवरणपत्रे ऑनलाइन आणि उर्वरित ऑफलाइन दाखल करण्यात आली आहेत.