आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारत सरकारने संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांवर भाष्य केले आहे. गोपीनाथ यांच्यामते नवे कृषीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
“भारतीय शेतीव्यवस्थेत सुधारणांची आवश्यकता आहे. नवे कृषीविषयक कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. परंतु गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणेही गरजेचे आहे.” असे गीता गोपीनाथ यांनी सांगितले.
भारत सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये लागू केलेले कृषीविषयक कायदे कृषीविषयात सुधारणा करणारे आहेत. या कायद्यांतर्गत दलालांना बाजूला सारून शेतकरी थेट बाजारपेठेत माल विकू शकेल. असा दावा भारत सरकार करत आहे.
या कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने पंजाब आणि हरणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला आंदोलनकर्त्यांनी दिल्लीमध्ये हिंसाचार घडवून आणला होता.
या कायद्याच्या समर्थनात आजवर अनेक अर्थतज्ज्ञांनी अग्रलेख लिहिले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनींही आता या कृषीविषयक कायद्यांचे समर्थन केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये ११.५% टक्क्याने वाढेल असे सांगितले आहे.