औद्योगिक क्षेत्राची घोडदौड सुरू

औद्योगिक क्षेत्राची घोडदौड सुरू

भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेल्या कोरोनाच्या फटक्यातून ती सावरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्राने वृद्धी नोंदवायला सुरूवात केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

सरलेल्या जूनमध्ये देशातील औद्योगिक उत्पादनाने १३.६ टक्के वाढ नोंदवली होती. मागील वर्षात घसरलेल्या प्रमाणाच्या तुलनेत ही मोठी वाढ आहे. एनएसओच्या अधिकृत आकडेवारीनुसार जून २०२१ मध्ये देशाचे निर्मिती क्षेत्र हे १३ टक्के दराने प्रगती पथावर होते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये निर्मिती क्षेत्राचे ७७.६३ टक्के योगदान असल्याने, या निर्देशांकांच्या दमदार सुधारलेल्या पातळीसाठी निर्मिती क्षेत्राची ही कामगिरी महत्त्वपूर्ण राहिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यातून सावरत, कारखानदारी आणि उत्पादन क्षमता पुन्हा रुळावर येत असल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

गेल्या वर्षातील असामान्य परिस्थितीच्या तुलनेत, यंदाच्या आकडेवारीची तुलना करणे समर्पक ठरणार नाही. मात्र कोरोना प्रतिबंधासाठी घातलेल्या निर्बंधांमद्ये हळूहळू शिथिलता आल्याने, आर्थिक उपक्रमांमध्ये सुधारणा होत आहे आणि त्याचे सापेक्ष प्रतिबिंब हे संबंधित आकडेवारीत उमटत आहे, असे निश्चितच म्हणता येईल, असे सांख्यिकी आर्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

निर्मीती क्षेत्रासोबत इतरही क्षेत्रांनी जोरदार मुसंडी मारली आहे. खाणकाम क्षेत्राने २३.१ टक्क्यांचा वृद्धीदर नोंदवला तर वीज निर्मिती क्षेत्रात देखील ८.३ टक्क्यांची वाढ जून महिन्यात नोंदवली गेली होती.

गेल्या वर्षी कोरोनाच्या उद्रेकाने एकूणच औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका बसला होता. औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणात आक्रसण्यास सुरूवात झाली होती. मात्र आता निर्बंधांत देण्यात आलेल्या शिथिलतेचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version