कोविड-१९ महामारीच्या काळात रेल्वेने वाढवलेले प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करून निष्कारण रेल्वे फलाटांवर येण्यापासून रोखण्यात येऊ शकेल असे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर वाढवण्याच्या काढलेल्या परिपत्रकानंतर रेल्वेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या स्पष्टीकरणानुसार स्थानकांवरील गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याची जबाबादारी त्या विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाची असणार आहे.
“ही तात्पुरती उपाययोजना आणि स्थानिक पातळीवरील उपाय आहे. रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि स्थानकांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी घेण्यात आलेला खबरदारीचा उपाय आहे.” असे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
“लोकांना स्थानकात येण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीचा वारंवार आढावा घेऊन वेळोवेळी प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर बदलते ठेवले आहेत. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन या दरांत बदल करण्याचे अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत” असेही या पत्रकात म्हटले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, हा जुना उपाय आहे आणि गर्दीच्या नियंत्रणासाठी रेल्वेकडून हा कधीकधी वापरण्यात आला आहे. त्यात नवे काही नाही.
लोकांना छोट्या अंतरावरील निष्कारण प्रवासापासून परावृत्त करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात छोट्या अंतरातील दरात हलकी भाडेवाढ करण्यात आली होती.