गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आणि अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठी झेप घेतली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेर इंडेक्सनुसार अदानी यांची संपत्ती ६५.२ अब्ज डॉलरवर पोचली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत १६व्या क्रमांकावर पोचले आहेत. अलकीडच्या काही दिवसात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत आलेल्या तेजीमुळे अदानी यांची संपत्ती वेगाने वाढली आहे. अदानी यांची एकूण संपत्ती १४ जूनला ७७ अब्ज डॉलरवर पोचली होती. त्यानंतर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या बरेच जवळ अदानी पोचले होते. मात्र १४ जूनला आलेल्या एका वृत्तामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत बरीच घसरण झाली आणि त्यांच्या संपत्तीमध्ये देखील घसरण झाली. यानंतर अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत २५ व्या स्थानावर आले होते.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत अलीकडच्या काही दिवसात पुन्हा जोरदार तेजी आली आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सना अनेक दिवस अप्पर सर्किट लागते आहे. तीन महिन्यांआधी अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकीवर पोचले होते. मात्र प्रसार माध्यमांमधून आलेल्या एका वृत्तामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. या वृत्तामध्ये नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि.ने तीन परदेशी फंड्स किंवा गुंतवणूक कंपन्यांचे अकाउंट गोठवल्याचे म्हटले होते. या गुंतवणूक कंपन्यांनी अदानी समूहाच्या ४ कंपन्यांमध्ये ४३,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच गुंतवणूक केलेली आहे. अर्थात अदानी समूहाने या वृत्तातील माहिती नाकारली होती.

हे ही वाचा:

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

भाजपा नेते सुनील यादव कालवश

लोहमार्ग पोलिसांना हवी पुरेशा मनुष्यबळाची सुरक्षा

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती ८५.६ अब्ज डॉलर आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत ८.८८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. रिलायन्सचा शेअर १६ सप्टेंबर २०२०ला २,३६९ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. याबरोबरच मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलरवर पोचली होती. त्यानंतर अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोचले होते. मात्र त्यानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत घट होत ते टॉप १० मधून बाहेर झाले आहेत.

Exit mobile version