शेतकरी थेट विक्रेते
देशभरात सध्या लागू करण्यात आलेल्या नव्या शेतकरी कायद्यांविरोधात हरियाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. विविध तज्ञांची त्यावर मतमतांतरे असताना, महाराष्ट्रातील ३५ शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन ‘शेतकरी मार्ट’ या नावाने अनोखा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत शेतीतील उत्पादनांच्या विविध प्रक्रियांसाठी विविध शेतकरी संघटनांनी हातमिळवली केली आहे.
या शेतकऱ्यांच्या मते सरकार अथवा खासगी विक्रेते त्यांचे भले करू शकणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनाच हातात हात घालून उभे राहावे लागेल. त्यामुळे शेतकरी संघटनांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे.
“आम्ही रिच ऍग्रीकल्चरल फार्मर प्रोड्युसर कंपनी (आर.ए.एफ.पी.सी) नुकतीच स्थापन केली. तेव्हा आमच्या लक्षात आले की शेतकरी केवळ उत्पादनात उत्तम आहेत मात्र त्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही इतर शेतकरी संघटना आणि बचत गटांशी चर्चा करायला सुरूवात केली. यातूनच शेतकरी मार्ट (फार्मर मार्ट)ची संकल्पना पुढे आली.” असे आर.ए.एफ.पी.सीचे संस्थापक सदस्य रविंद्र कांबळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र १९४० शेतकरी संघटनांसह देशात सर्वात जास्त शेतकरी संघटना असलेले राज्य आहे. परंतु यापैकी अनेक शेतकरी संघटनांकडे पुरेशी विक्री पध्दत नसते. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्व वस्तु व खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या शेतकरी मार्ट या संकल्पनेला सर्वच्या सर्व ३५ शेतकरी संघटनांच्या सभासदांनी पाठिंबा दर्शवला आहे.
शेतकरी मार्ट ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू करण्यात आले आणि त्यातून रोजच्या रोज ₹१०,००० किंमतीची विक्री होत आहे. कंपनी प्रतिमहिन्याचे भाडे ₹५०० देते, तर प्रत्येक विकल्या गेलेल्या वस्तुवर ५ टक्के कमिशन मार्टच्या संचालनासाठी देते. ही नुकतीच सुरूवात असून कंपनीचा अधिक विस्ताराचा मानस आहे.
सातारा जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मते अशा प्रकारच्या अधिकाधीक कंपन्या उदयास येणे आवश्यक आहे. टाळेबंदीच्या काळात महाराष्ट्रात ३०३ शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन ₹५५० कोटींची उलाढाल करून दाखवली होती.
शेतकरी मार्टच्या कल्पनेने पुणे-सातारा-कोल्हापूर महामार्गवरून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांंना थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्याचे समाधान दिले आहे.