केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारी २०२२ रोजी संसदेत २०२२- २३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला सीतारामन या सलग चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार असून ते ८ एप्रिल २०२२ पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल, तर अर्थमंत्री १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पाविषयी काही विशेष माहिती जाणून घेऊया.
- भारतात प्रथमच ७ एप्रिल १८६० रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित नेते जेम्स विल्सन यांनी भारताचा अर्थसंकल्प ब्रिटिश सम्राज्ञीसमोर ठेवला.
- स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. (तत्कालीन) अर्थमंत्री आरके षण्मुखम चेट्टी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला होता.
- सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर आहे. २०२०- २१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी २ तास ४२ मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले होते. यादरम्यान निर्मला सीतारामन यांनी जुलै २०१९ मध्ये केलेल्या २ तास १७ मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात एकूण १८ हजार ६५० शब्द होते. त्यानंतर अरुण जेटली यांच्या २०१८ च्या अर्थसंकल्पीय भाषणात १८ हजार ६०४ शब्द होते.
- सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषणाचा विक्रम तत्कालीन अर्थमंत्री हिरुभाई मुळजीभाई पटेल यांच्या नावावर आहे, ज्यांनी १९७७ मध्ये केवळ ८०० शब्दांचे अर्थसंकल्पीय भाषण केले होते.
- सर्वाधिक अर्थसंकल्पीय भाषणांचा विक्रम माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्याकडे आहे, त्यांनी अर्थमंत्री असताना १९६२-६९ दरम्यान सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पी. चिदंबरम यांनी नऊ वेळा, प्रणव मुखर्जी यांनी आठ वेळा, यशवंत सिन्हा यांनी आठ वेळा आणि मनमोहन सिंग यांनी सहा वेळा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे.
- साधारणपणे १९९९ सालापर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता सादर केला जात असे. परंतु, १९९९ मध्ये अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ते बदलून सकाळी 11 वाजता सादर केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री अरुण यांनी १ फेब्रुवारी २०१७ रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जातो.
- १९५५ पर्यंत अर्थसंकल्प इंग्रजीतच मांडला जात होता, पण काँग्रेस सरकारने तो इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत सादर करण्यास सुरुवात केली. कोविड-१९ महामारीनंतर २०२१- २२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प पेपरलेस सादर करण्यात आला.
हे ही वाचा:
पालिकेच्या विशेष सभेत कॉंग्रेसच्या नगरसेवकाचा धुआ, धुआ
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मणिपूरमध्ये पहिली मालवाहू ट्रेन
सरकारने वाईन सर्वसामान्य दुकानात आणली…म्हणून त्यांनी परत केला पुरस्कार
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्री म्हणून १९७० साली सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून २०१९ मध्ये अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या.
- सन २०१७ पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात होता. २०१७ मध्ये, रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. आता फक्त एकच अर्थसंकल्प सादर केला जातो.
- सन १९५० पर्यंत अर्थसंकल्पाची छपाई राष्ट्रपती भवनात केली जात होती, परंतु ती लीक झाल्यानंतर मिंटो रोड, नवी दिल्ली येथील प्रेसमध्ये छपाई सुरू झाली. त्यानंतर १९८० मध्ये ते अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सरकारी प्रेसमध्ये छापले गेले. कोरोनाच्या काळात मर्यादित प्रतींमध्ये अर्थसंकल्पाची छपाई केली गेली.