पारदर्शक सरकारी धोरणे,कायदे आणि व्यवसाय प्रारूपाचे भारतात अनुसरण केले जाते. यामुळेच भारत हे परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनण्यास मदत झाली आहे, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नमूद केले.
आयफोन ॲपल चे निर्माते बदलत्या जागतिक व्यवसायाला अनुसरून भारतातून उत्पादनात वाढ करण्याचा विचार करीत असून, सध्याच्या जागतिक उत्पादनात असलेला पाच ते सात टक्के वाटा हा पुढे जाऊन २५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा कंपनीचा मानस आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे जगात वापरात येणारा प्रत्येक चौथा आयफोन हा भारतातून तयार होऊन निर्यात झालेला असेल. असेही प्रतिपादन पियुष गोयल यांनी केले आहे.
उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेमुळे भारत देश परदेशी गुंतवणूकदारांसाठी एक पसंतीचे ठिकाण बनण्यास मदत झाली आहे, असे गोयल यांनी आवर्जून नमूद केले. भारतीय उद्योग महासंघ अर्थात सीआयआयद्वारे आयोजित परिषदेेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. ॲपलने भारतात उत्पादित केलेली त्यांची सर्वात अलीकडील मॉडेल्सचे अनावरण भारतात करण्याची प्रथा सुरू केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्थ मूव्हर्स यंत्रांच्या क्षेत्रातील आणखी एका परदेशी कंपनीचे उदाहरण देत गोयल म्हणाले की, भारताच्या उत्पादनाच्या स्पर्धात्मकतेमुळे ती कंपनी आता भारतातून परवडणाऱ्या आणि स्पर्धात्मक किमतीत उत्पादने घेत असून, एकूण ११० देशांना त्यांची उत्पादने पुरवत आहेत आणि नवनवीन उत्पादनांचे अनावरण देखील आपल्याकडे करत आहे.
हे ही वाचा:
टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र
कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम
ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’
‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत
याच कार्यक्रमात बोलताना, दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, भारतात ॲपल आयफोन तयार करणाऱ्या सर्वात मोठ्या उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी झाली असून, हा प्रकल्प बेंगळूरुजवळ होसूर येथे येत आहे. या प्रकल्पातून सुमारे ६०,००० लोकांना रोजगार मिळेल , अशी त्यांनी माहिती दिली. भारतात सध्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीतील दिग्गज कंपन्या – फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्यांद्वारे निर्मित आयफोन तयार केले जातात.
जागतिक आर्थिक अनिश्चिततेबद्दल मत व्यक्त करताना, चालू वर्ष हे जगासाठी आव्हानात्मक असेल, असे गोयल यांनी नमूद केले. अनेक देशांमध्ये महागाई दर खूप जास्त आहे, परंतु अशा परिस्थितीतही भारताने अनेक वस्तूंच्या किमती नियंत्रित केल्या आहेत. केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत सरासरी साडेचार टक्के महागाई दर राहिला आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, पूर्वी महागाई दर निरंतरपणे दहा ते बारा टक्क्यांच्या पातळीवर होता. विकसित अर्थव्यवस्था मंदावत चालल्या आहेत, तर त्याच वेळी मोदी सरकारने उचललेल्या पावलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे, असेहि गोयल म्हणाले.