एक प्रचलित अशी सोशल मीडिया कंपनी ट्विटरला आता नवे मालक मिळाले आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी सोमवार, २५ एप्रिल रोजी विकत घेतली आहे. ४४ अब्ज डॉलरमध्ये हा करार पार पडला.
एलॉन मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रति शेअर प्रमाणे ट्विटरचे १०० टक्के शेअर्स सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. अखेर वाटाघाटीनंतर हा सौदा ४४ अब्ज डॉलरला निश्चित करण्यात आल्याची माहिती ‘रॉयर्स’ने दिली आहे.
काही आठवड्यांपूर्वी एलॉन मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले होते. त्यांनतर ते ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले होते. दरम्यान त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरला खरेदी करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला होता. एलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतर ट्विटरच्या शेअर्सने ९ टक्क्यांची उसळी घेतली होती.
हे ही वाचा:
राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
सोमय्याप्रकरणी महाडेश्वरांना अटक व जामीन
एलॉन मस्क यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे. ट्विटर हे असं डिजीटल माध्यम आहे ज्यावर भविष्यात मानवी जीवनावर परिणाम होऊ शकणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा होतात. ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणायचे आहेत. लोकांचा या माध्यमावरील विश्वास वाढवण्यासाठी हे एक ओपन सोर्स अल्गोरिदम असणारं माध्यम करायचं आहे. स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचे ऑथेंटिकेशन अशी बरीच काम आहेत. ट्विटरमध्ये फार क्षमता आहे. कंपनीसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. तसेच या माध्यमावर असणाऱ्यांसाठी नवीन दारं उघडली जाणार आहेत,” अशा आशयाचे ट्विट एलॉन मस्क यांनी केलं आहे.
🚀💫♥️ Yesss!!! ♥️💫🚀 pic.twitter.com/0T9HzUHuh6
— Elon Musk (@elonmusk) April 25, 2022