सरकारच्या जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या धोरणाचा फायदा लवकरच सामान्यांना देखील मिळणार आहे. जुनी गाडी विकून नवी घेणाऱ्यांना गाडी उत्पादकांकडून ५ टक्के सवलत मिळणार आहे, अशी माहिती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
भारतात उभा राहणार ओलाचा सर्वात मोठा इलेक्ट्रिक स्कुटर कारखाना
केंद्र सरकारच्या २०२१-२२ अर्थसंकल्पात वाहन भंगारात काढण्याची योजना मांडण्यात आली होती. या योजने अंतर्गत वैयक्तिक वाहने २० वर्ष आणि व्यावसायिक वाहनांसाठी १५ वर्ष एवढी मुदत ठरविण्यात आली आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी उत्पादक नव्या गाडीच्या खरेदीवर ५ टक्क्यांची सूट देतील.
या योजने अंतर्गत सार्वजनिक- खासगी भागिदारीतून वाहनांची तपासणी करणारी यंत्रणा निर्माण करण्यात येईल. या यंत्रणेमार्फत वाहनांची तपासणी करण्यात येऊन जी वाहने या परिक्षणात अनुत्तीर्ण ठरतील त्या वाहनांच्या मालकांना जबर दंड आकारण्यात येण्यार आहे.
या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहन उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे क्षेत्र भारतातील सर्वात जास्त वृद्धी असणारे क्षेत्र बनेल. मंत्रीमहोदयांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेमुळे वाहन उत्पादन क्षेत्रात ३० टक्क्यांची वृद्धी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या क्षेत्रातील उलाढाल सध्याच्या ₹४.५ लाख कोटींपासून वाढून ₹१० लाख कोटीपर्यंत जाऊ शकेल.