पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यु खुरजा- न्यु भाऊपूर या दरम्यानच्या 351 कि.मी लांबीच्या स्वतंत्र मालवाहक मार्गिकेचे आणि ऑपरेशन कंट्रोल सेंटरचे (ओ.सी.सी) उद्घाटन केले. या मार्गिकेचे ओ.सी.सी प्रयागराज येथे स्थित आहे.
महिलाबाद येथील आंबा उत्पादक, राजस्थानातील संगमरवराचे व्यापारी, फरिदाबाद येथील वाहन उत्पादक, कानपूर आणि आग्रा येथील चामड्याचे व्यापारी यांना या स्वतंत्र मार्गिकेचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल.
ग्राहक, उद्योजक, शेतकरी, व्यापारी, आणि इतर सर्वांनाच या स्वतंत्र मालवाहक मार्गिकेचा फायदा होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. त्याबरोबरच या पायाभूत सुविधांची आंदोलनांच्या नावाखाली नासधूस करू नये असे आवाहन देखील त्यांनी केली. आपल्या लोकशाही अधिकारांचा वापर करताना, आपल्या जबाबदाऱ्यांचा विसर पडता कामा नये, असेही ते म्हणाले. पायाभूत सुविधा ह्या देशाच्या विकासाचा पाया असल्याचे त्यांनी याप्रसंगी बोलताना म्हटले.
या मार्गिकेवरून 1.5 कि.मी लांबीची मालगाडी जाऊ शकते असे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये स्थित असलेली ही 351 कि.मी लांबीची स्वतंत्र मार्गिका स्थानिक उद्योगांसाठी वरदान ठरेल. कानपुर जिल्ह्यातील पुखऱ्यान येथील ऍल्युमिनीयम, औरय्या जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय, इटावा जिल्ह्यातील कापड उद्योग, फिरोजाबाद जिल्ह्यातील काच उद्योग, बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा येथील मातीची उत्पादने, हाथरसमधील हिंग उत्पादक, अलिगढ येथील टाळे आणि हार्डवेअर उद्योग इत्यादी उद्योगांसाठी ही मार्गिका फायद्याची ठरेल.
टाटा प्रोजेक्ट लि. तर्फे बांधल्या गेलेल्या या मार्गिकेमुळे अतिशय व्यग्र असलेल्या कानपुर- दिल्ली मार्गावरील मुख्य लाईनवरील वाहतूक दुसरीकडे वळेल. त्यामुळे रेल्वेला अधिक वेगवान गाड्या धावडवणे शक्य होईल. प्रयागराज येथे या संपूर्ण मार्गिकेचे मुख्य संचलन केंद्र (ओ.सी.सी) असेल. या लांबीचा हा जगातील एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ₹81,459 कोटींचा खर्च करण्यात आला होता.