भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या आयपीओची सर्व भारतीय जनता आतुरतेने वाट पाहत आहे. या आयपीओकडे नवीन गुंतवणूकदरांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या मेगा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देशातील १४ टक्के लोकसंख्या निश्चितपणे सहभाग घेईल, असा एलआयसी ने अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार एलआयसी या गुंतवणूकदारांकडून अंदाजे २५ हजार कोटींचा निधी गोळा करू शकते.
एलआयसी हा जगातील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा विमा ब्रँड आहे. तर एलआयसीचा आयपीओ आल्यानंतर ही विमा कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीला मार्केट कॅपमध्ये मागे टाकून देशातील सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. एलआयसीने आयपीओसंदर्भात सेबीला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सरकार ३१ कोटी ईक्वीटी शेअर्सद्वारे पाच टक्के स्टेक विकणार आहे. आतापर्यंत एलआयसीमध्ये सरकारची शंभर टक्के भागीदारी होती.
आयपीओ मध्ये सामील असलेल्या सर्व वैयक्तिक गुंतवणूकदारांची सरासरी गुंतवणूक तीस ते चाळीस हजार दरम्यान असू शकते. एलआयसीच्या अंदाजानुसार ७५ लाख ते एक कोटी किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये सहभागी होऊ शकतात. यामध्ये एलआयसीचे पॉलिसीधारक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारचा अंदाज आहे की भारतात सध्या ७३.८ दशलक्ष म्हणजेच ७ कोटी ३८ लाख लोकांचे डिमॅट खाते आहे.
हे ही वाचा:
किशोरी पेडणेकर, संजय राऊत भाजपवर घसरले
देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या भेटीला
मुंबईकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या परिषदेचे यजमानपद
एलआयसीने आपल्या पॉलिसी धारकांसाठी या आयपीओमध्ये आरक्षण दिले आहे.त्यामुले पॉलिसीधारक मोठ्या प्रमाणात डिमॅट खाती उघडत असून देशातील एकूण डिमॅट खातेदारांची संख्या आठ कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.