आयआयटीमध्ये (IIT) सध्या कॅम्पस सिलेक्शनची प्रक्रिया सुरू असून नामवंत कंपन्यांकडून शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या ऑफर देण्यात येत आहेत. पहिल्याच टप्प्यात देशातील आठ टॉप आयआयटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना ९ हजार नोकऱ्यांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये १६० जॉब ऑफर हे वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराचे आहेत. कोरोना संकटकाळानंतर आणि आर्थिक चक्र बिघडलेल्या काळानंतर यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना चांगल्या ऑफर्स देण्यात येत आहेत.
एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आयआयटी कानपूरचे ४९, आयआयटी दिल्लीचे ३० विद्यार्थी आणि आयआयटी मद्रासचे २७ विद्यार्थी आहेत. आयआयटी रुरकीच्या ११ आणि आयआयटी गुवाहाटीच्या ५ विद्यार्थ्यांना तब्बल १ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. तर आयआयटी मुंबईचे १२, आयआयटी खरगपूरचे २० आणि आयआयटी बीएचयुच्या २ विद्यार्थ्यांना १ कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. यावर्षी वेतनातील सरासरी वृद्धी १५ ते ३५ टक्क्यांदरम्यान आहे.
हे ही वाचा:
… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक
रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
राज्यात ओमिक्रोन रुग्णांची संख्या शंभरी पार
मागील वर्षी कॉलेजच्या कोणत्याही विद्यार्थ्याला १ कोटी रुपयांच्या पगाराची ऑफर मिळाली नव्हती. यावर्षी देशातील आणि विदेशातील दोन्ही कंपन्यांनी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना देऊ केल्या आहेत. सर्वाधिक देशांतर्गत ऑफर १.८ कोटी प्रति वर्ष तर आंतरराष्ट्रीय कंपनीची ऑफर २.१५- २.४ कोटी इतकी आहे. चांगले तंत्रज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठी कंपन्यांनी या ऑफर दिल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.