चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

चांद्रयान- ३ मोहिमेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या चांद्रयान- ३ ने चंद्रावर स्वारी करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहेच; परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्‍या अनेक क्षेत्रांसाठी संधींची कवाडेही खुली झाली आहेत. त्यामुळे भारत हा जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमणा करतो आहे.

इस्रोच्या उल्लेखनीय पराक्रमाने अवकाश तंत्रज्ञान, एरोस्पेस, संरक्षण आणि संशोधन व विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या अनेक स्टार्ट-अप आणि कंपन्यांसाठी संधींचे एक नवीन क्षितिज उघडले आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या कामगिरीमुळे अंतराळ संशोधनासाठी सरकारच्या भविष्यातील अर्थसंकल्पीय तरतुदीला चालना मिळण्याची शक्यता असली तरी, यामुळे संलग्न क्षेत्रांमध्ये खासगी गुंतवणुकीला चालना मिळेल आणि आर्थिक वाढीस हातभार लागेल.

भारतामध्ये आधीच १४० नोंदणीकृत अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट-अप आहेत आणि यशस्वी चांद्र मोहिमेमुळे त्या प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची शक्यता आहे. किंबहुना, एक किफायतशीर उपग्रह प्रक्षेपक म्हणून भारताचे स्थान प्रस्थापित होऊ शकते. ज्यामुळे एरोस्पेस आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांना फायदा होईल, असे एयूएम कॅपिटल वेल्थ मॅनेजमेंटचे प्रमुखमुकेश कोचर यांनी सांगितले. ‘भारतासाठी हा सर्वांत मोठा टप्पा आहे. जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान सध्या सुमारे दोन ते तीन टक्के आहे आणि पुढील आठ ते १० वर्षांत सुमारे आठ ते १० टक्के योगदान अपेक्षित आहे. यामुळे भारत एक किफायतशीर उपग्रह प्रक्षेपक म्हणून प्रस्थापित होईल आणि जागतिक संधी निर्माण होऊ शकेल. एरोस्पेस आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रांना चालना मिळेल,’ असा आशावाद कोचर यांनी व्यक्त केला.

‘भारतात जवळपास १४० नोंदणीकृत स्पेस स्टार्टअप्स आहेत. या उल्लेखनीय शानंतर या स्टार्टअप्सनी भरपूर गुंतवणूक मिळवणे आवश्यक आहे. पुढील काळात अर्थसंकल्पीय तरतूदही वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,’ असेही ते म्हणाले. डेलॉइट इंडियाचे भागीदार श्रीराम अनंतसायनम यांनीही याला सहमती दर्शवली. ‘अशा प्रकारचे, आयुष्यात एकदाच येणारे ऐतिहासिक क्षण, आपल्या देशवासीयांना एकत्र आणताना, भारतातील तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वाढवण्याचा मार्गही मोकळा करतात. त्यामुळे उदयोन्मुख क्षेत्रे आणि तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याचा एक वेगवान मार्ग तयार झाला असून आणि जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये येण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे,’ असे श्रीराम यांनी सांगितले.

‘चांद्रयान ३ यशस्वीपणे चंद्रावर उतरल्यामुळे अंतराळावर जाणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचे स्थान मजबूत झाले आहे. त्यामुळे अंतराळ क्षेत्रातील भारतातील कंपन्यांमध्ये नवीन स्वारस्य निर्माण होईल, ज्यात अन्वेषण, घटक निर्मिती, नेव्हिगेशन आणि मॅपिंग, निरीक्षण आणि अन्य विविध प्रकल्पांचा समावेश असेल,’ अशी आशा इंडुस्लॉ कंपनीचे संस्थापक भागीदार कार्तिक गणपती यांनी व्यक्त केली.

‘नवीन भारतीय अंतराळ धोरण २०२३’ हे भारतीय उद्योगांसाठी एक संकेत आहे. ज्यायोगे देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात या उद्योगांनी आता त्यांची भूमिका आता सक्रियपणे शोधायला हवी. भारतातील अंतराळ क्षेत्र आणि संबंधित उद्योगांमध्ये सकारात्मक वाढ होण्याची आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

‘मेक इन इंडिया’ला चालना

इस्रोच्या यशस्वी चांद्रमोहिमेमुळे ‘मेक इन इंडिया’ ब्रँड आणखी मजबूत होईल आणि उपग्रह प्रणाली, दूरसंचार आणि बरेच काही विकसित करण्यात गुंतलेल्या घरगुती कंपन्यांच्या वाढीस हातभार लागेल. सॅटेलाइट सिस्टम, टेलिकम्युनिकेशन्स, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही क्षेत्रांमध्ये व्यवहार करणाऱ्या क्षेत्रांना चांगल्या संधी आहेत. त्यामध्ये उपकरणांचे डिझाईन, असेंब्लिंग आणि अवकाश संशोधनासाठी तंत्रज्ञानचाचणीचे काम करणाऱ्या कंपन्यांचा समावेश असू शकतो,’ असा विश्वास पीएमएस, अबॅन्स इन्व्हेस्टमेंटचे फंड मॅनेजर कौशिक दाणी यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

चांद्रयानात इस्रोकडून एआय तंत्रज्ञानाचा वापर

विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा हा क्षण!

वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत दिल्लीतील जामा मशिदीला नोटीस

भारत चंद्रावर आहे; चांद्रयान- ३ च्या यशानंतर इस्रो प्रमुख सोमनाथन यांचे गौरवोद्गार

देशांतर्गत बाजारपेठांवर दीर्घकालीन परिणाम

चांद्रयान-३च्या यशाचा भारतीय देशांतर्गत बाजारपेठांवर दीर्घकालीन प्रभाव पडेल, अवकाश संशोधनातील भारताच्या क्षमतेबद्दल विदेशी गुंतवणूकदारांची धारणा बदलेल. अंतराळ संशोधनातील भारताची क्षमता आणि ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या विविध उपक्रमांच्या परिणामकारकतेबद्दल विदेशी गुंतवणूकदारांच्या धारणा बदलण्याची शक्यता आहे,’ असे स्टॉटबॉक्सचे संचालक स्वप्नील शाह यांनी सांगितले. मिशनच्या यशामुळे एरोस्पेस, संरक्षण आणि दूरसंचार (सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन) यासारख्या विविध संलग्न क्षेत्रांसाठी दरवाजे खुले होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version