केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारला महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे हा भत्ता आता ४२ टक्के झाला आहे.
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत देण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. महागाई भत्ता ३८% वरून ४२% करण्यात आला आहे. महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी १२,८१५.६० कोटी रुपयांचा बोजा पडेल. ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकृत सूत्रानुसार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ झाल्याने आता कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. समजा सध्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,०० रुपये प्रति महिना आहे. आधीच्या ३८ टक्केनुसार त्यांना पूर्वी ६,८४० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता डीए ४ टक्क्यांनी वाढला आहे. १८,००० रुपयांच्या मूळ पगारावर ही वाढ ७२० रुपये होईल. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे, मूळ वेतन १८,००० रुपये असलेल्या कर्मचाऱ्याला आता ७,५६० रुपये महागाई भत्ता मिळेल.
दोन महिन्यांची थकबाकी मिळणार
केंद्र सरकारने जानेवारीच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे या प्रकरणात हा भत्ता १ जानेवारी २०२३ पासून लागू केला जाईल. अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही दोन महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. हेही मार्च महिन्याच्या पगारासह दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.