पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने १जुलै २०२२ पासून केंद्र सरकारच्या कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत मंजूर केली. देशात सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६१ लाखांहून अधिक पेन्शनधारक आहेत. या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.
गरिबांना मोफत रेशन देण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी रेशन योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ही माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, देशातील ८० कोटी गरिबांना दरमहा ५ किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
नवरात्र २०२२: सप्तशृंगी गडावर, देवीचा जागर
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव
मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी
महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना १ जुलै २०२२ पासून अनुक्रमे वर्धित महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळतील.
रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास
केंद्रीय मंत्रिमंडळाने १९९ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सरकारच्या निर्णयानुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानक, सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकासह या सर्व रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी ६०,००० कोटी रुपये खर्च येणार आहेत.