युको बँकेतील ८२० कोटी रुपयांच्या आयएमपीएस घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने चापेमारी केली आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये तब्बल ६७ ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. यूको बँकेकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, सीबीआयने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुन्हा दाखल केला होता.
गतवर्षी १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान युको बँकेच्या ४१ हजार खातेदारांच्या खात्यात अचानक ८२० कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे एकीकडे ही रक्कम खात्यांमध्ये जमा होत असताना ज्या खात्यांमधून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती त्या खात्यांमधून डेबिट झाल्याची नोंद झालेली नाही. संशयित व्यवहारानंतर आयएमपीएसच्या माध्यमातून अवघ्या तीन दिवसांत ८.५३ लाखांहून अधिक व्यवहार करण्यात आले होते. खासगी बँकांच्या १४ हजार खातेदारांपर्यंत आणि युको बँकेच्या खातेदारांच्या ४१ हजार खात्यांपर्यंत ८२० कोटी रुपये पोहोचले होते. व्यवहार डेबिटची नोंद झाली नाही आणि अनेक खातेदारांनी अचानक आपल्या खात्यात आलेली ही रक्कम काढली.
सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युको बँकेत काम करणारे दोन सहाय्यक अभियंते आणि बँकेत काम करणाऱ्या इतर अनोळखी व्यक्तींविरोधात गेल्या वर्षी एफआयआर दाखल करण्यात आला होता. छाप्यात मोबाइल फोन, लॅपटॉप, कंप्यूटर सिस्टम्स, ईमेल अर्काइव्ह आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डसह इलेक्ट्रॉनिक पुरावे सापडले होते.
हे ही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
युको बँकेच्या तक्रारीवरून नोव्हेंबर २०२३ च्या अखेरीस हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोप असा आहे की, १० ते १३ नोव्हेंबर दरम्यान, सात खाजगी बँकांच्या सुमारे १४,६०० खातेदारांकडून आयएमपीएस आवक व्यवहार ४१ हजारहून अधिक युको बँक खातेधारकांच्या खात्यांमध्ये चुकीच्या पद्धतीने पोस्ट केले गेले. परिणामी, ८२० कोटी रुपये युको बँक खात्यांमध्ये त्यांच्या स्रोत बँकांमधून प्रत्यक्षात पैसे डेबिट न करता जमा झाले.