पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकाळात रखडवण्यात आला होता. परंतु आता या प्रकल्पाला आणखी गती मिळणार आहे. रेल्वे अर्थसंकलपमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राबविणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड साठी पुढील आर्थिक वर्षाकरीता १९,५९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाने २०२२ -२३च्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ५,००० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यावेळी हे बहुतांश काम गुजरातपर्यंत मर्यादित होते. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाने १९,५९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या तरतुदीमुळे महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे काम जलद गतीने सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वेसाठी १३,५३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील तरतूद २००९ ते २०१४ मधील सरासरी वाटपाच्या तुलनेत ११ पट अधिक असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून केंद्र सरकारला चांगले सहकार्य मिळत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकारकडून कोणतीही मान्यता मिळाली नसल्याचे रेल्वेमंत्री यांनी सांगितले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्यास तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. असेही ते म्हणाले. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे.
हे ही वाचा:
मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…
प्रथमच ५० हजार कोटींपेक्षा अधिकचा बीएमसीचा अर्थसंकल्प
पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त
रेल्वे मंत्री वैष्णव म्हणाले, राज्यात नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी १,६८५ कोटी रुपये खर्च केले जातील. ट्रॅक नूतनीकरणासाठी १,४०० कोटी रुपये, ग्राहक सुविधांसाठी ७७६ कोटी रुपये, सिग्नलिंग आणि दूरसंचार कामांसाठी २३७ कोटी रुपये आणि पूल आणि बोगदे बांधण्यासाठी ११३ कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. वर्धा नागपूरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गासाठीही ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बडनेरा वॅगन दुरुस्ती कार्यशाळेसाठी ४० कोटी रुपये देण्याबरोबरच वर्धा-नांदेड मार्गे यवतमाळ पुसद आणि इटारसी-नागपूर दरम्यान ट्रॅकही टाकण्यात येणार आहे.