देशात ५जी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया फेब्रुवारी २०२२ पर्यंत पार पडेल. केंद्र सरकारला शक्य झाल्यास ही प्रक्रिया जानेवारी महिन्यातही पूर्ण होऊ शकते, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. या घोषणेमुळे दूरसंचार क्षेत्रात नवे चैतन्य संचारण्याची शक्यता आहे. दूरसंचार क्षेत्रात मंत्रिमंडळाने मंजूर केलेले सुधारणा पॅकेज सध्याच्या कंपन्यांना बाजारात टिकण्यासाठी पुरेसे आहे. पुढील सुधारणा आणि संरचनात्मक बदल विचाराधीन आहेत. या क्षेत्रात अधिक कंपन्या आल्या पाहिजेत, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
अडचणीत सापडलेल्या दूरसंचार क्षेत्रासाठी केंद्रीय सुधारणा पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पॅकेजमध्ये वैधानिक देयके भरण्यापासून चार वर्षांची स्थगिती, स्पेक्ट्रम शेअरिंग, सकल समायोजित महसूल (एजीआर) ची व्याख्या बदलणे आणि स्वयंचलित मार्गाने १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणे समाविष्ट आहे. यासंदर्भात माहिती देताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, टेलिकॉम कंपन्यांचे अस्तित्व, क्षेत्रातील स्पर्धात्मकता टिकवून ठेवणे आणि क्षेत्राची ताकद या दृष्टीने ते नक्कीच चांगले आहे. आणखी काही बदल प्रस्तावित आहेत. मला खात्री आहे की त्यामुळे या क्षेत्रात आणखी कंपन्या येतील, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागाने व्ही, एअरटेल आणि रिलायन्स जिओसह दूरसंचार ऑपरेटर्सना ग्रामीण भागात ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास सांगितले होते. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात ५ जी अॅप्लिकेशन्सच्या चाचणीसह ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितले आहे. एमटीएनएलने दिल्लीत ५ जी च्या चाचण्यांसाठी सी-डॉटसोबत काम सुरु केलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ते नजफगडजवळ ५ जी टेस्ट करणार आहेत. कंपनीने शुल्क जमा केल्यानंतर त्यांना ट्रायल स्पेक्ट्रम दिलं जाईल.
हे ही वाचा:
फ्रान्सने आयएसआयएस प्रमुखाला संपवले
अभिनेत्याच्या जाचाला कंटाळून शरीरसौष्ठवपटू मनोज पाटीलची आत्महत्या
पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!
तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…
दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी ५जीच्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला ७०० मेगाहर्ट्झ बँड, ३.३-३-६ गीगाहर्ट्झ बँड आणि २४.२५-२८.५ गीगाहर्ट्झ बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.