भारतीय सरकारच्या मालकीची असलेल्या ‘भारत हेव्ही इलेक्ट्रीक लिमिटेड’ला (भेल) भारतीय अणुऊर्जा महामंडळाकडून (एन.पी.सी.आय.एल) ३२ रिऍक्टर हेडर असेंब्लीची मागणी करण्यात आली आहे.
देशभरात विविध ठिकाणी चालू करण्यात येणाऱ्या अणु ऊर्जा प्रकल्पांकरिता ७०० मीटर वॉटर इक्विव्हॅलन्ट (एम.डब्ल्यू.ई) ताकदीचे प्रेशराईज्ड हेव्ही वॉटर रिऍक्टर (पी.एच.डब्ल्यू.आर) बनविण्याची मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या असणाऱ्या या रिऍक्टरची घाऊक प्रमाणात मागणी करण्यात आली आहे.
एन.पी.सी.आय.एल तर्फे करण्यात आलेली ही पहिलीच सगळ्यात मोठी मागणी देशी कंपनीला देण्यात आल्याने स्वदेशी बनावटीच्या वस्तु वापरण्याला चालना मिळेल असे सांगितले जात आहे.
सरकारने २०१७ मध्येच घाऊक खरेदीच्या धर्तीवर १० पी.एच.डब्ल्यू.आर विकत घेण्याची परवानगी दिलेली होती. या संदर्भात प्रसिध्द करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार या अणुभट्ट्यांमुळे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत योजनेला चालना मिळेल.
भेल आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळाचा जुना संबंध आहे. भेल अगदी सुरूवातीपासून भारतीय अणुभट्ट्यांसाठी रिऍक्टर हेडर, स्टीम टर्बाइन, स्टीम जनरेटर, मोटर इत्यादींची पुरवठादार राहिली आहे. भारतात आतापर्यंत चालू करण्यात आलेल्या सर्व ७०० एम.डब्ल्यु.ई क्षमतेचे पी.एच.डब्ल्यु.आर आधारित अणुभट्ट्यांत सर्व रिऍक्टर हेडर असेंब्ली भेलकडूनच पुरवण्यात आल्या आहेत.