रेल्वेचे डबे धुण्यासाठी हाताचा वापर करण्यापेक्षा यंत्राचा उपयोग फायदेशीर ठरेल ही बाब आता लक्षात येऊ लागली आहे.
पश्चिम रेल्वेने रेल्वेचे डबे धुण्याचे स्वयंचलित यंत्र वांद्रे टर्मिनसमध्ये बसवण्यासाठी परवानगी दिली आहे. या यंत्रांमुळे पाणी, वेळ आणि मनुष्यबळ यांची बचत होणार आहे. सध्याच्या यंत्रणेनुसार रेल्वेचे प्रत्येक डबे रसायने, पाणी वापरून हाताने स्वच्छ केले जातात. यात मनुष्यबळ अधिक लागते शिवाय पाणी आणि वेळेचाही अधिक अपव्यय होतो. नवीन यंत्रणांमुळे ४० टक्के पाण्याचा वापर कमी होणार आहे, असे ‘टाइम्स’ वृत्तपत्राच्या अहवालात म्हटले आहे.
स्वयंचलित यंत्रणेत रेल्वेच्या डब्याच्या सफाईचे काम हे पाच टप्प्यात केले जाईल. पहिले रेल्वे ५ ते १० किलोमीटर वेगाने यंत्रणेच्या इथे चालवली जाईल तेव्हा पहिले पाण्याचा फवारा डब्यांवर मारला जाईल. पुढच्या टप्प्यात साबणाच्या पाण्याचा फवारा डब्यांवर मारला जाईल. यंत्रणेच्या तिसऱ्या टप्प्यात नायलॉनच्या ब्रशने डब्यांच्या बाहेरील बाजू साफ केली जाईल. नंतरच्या टप्प्यात पहिले प्रक्रिया केलेल्या पाण्याने डबे स्वच्छ केले जातील आणि मग स्वच्छ पाण्याने धुतले जातील. शेवटच्या टप्प्यात डब्यांना सुकवले जाईल.
हे ही वाचा:
अनिल परबांची चौकशी करा! लोकायुक्तांना राज्यपालांचा हिरवा कंदिल
बाळासाहेबांच्या नावावर हडपलेल्या महापौर बंगल्यात बिल्डरांची गर्दी होते ते कसे चालते?
जुन्या पद्धतीने काम करायला २४ डब्यांच्या रेल्वेला सध्या तीन तास लागतात; तर या यंत्रणेला २४ डब्यांच्या रेल्वेसाठी १० मिनिटांचा कालावधी लागतो. जुन्या पद्धतीत एका डब्याला १०० लिटर पाणी लागते तर नवीन यंत्रणेत ६० लिटर पाणी लागते. ८० टक्के पाणी हे प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यात येते. यंत्रणेची किंमत १.७८ करोड इतकी आहे. सध्या देशात २९ स्वयंचलित यंत्रणा असून चार यंत्रणा मुंबईत आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, वाडी बंदर आणि मुंबई सेन्ट्रल इथे यंत्रणा असून आता वांद्रे टर्मिनस येथेही नवीन यंत्रणा बसवली जाणार आहे.