सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक नावाजलेला चेहरा अतुल खिरवडकर यांची राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळचे (NUCFDC) पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नागरी सहकारी बँकांसाठी चांगले परिवर्तन म्हणून ते काम करतील.
मंगळवार, १६ मे रोजी खिरवडकर यांना कल्याण जनता सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून मुक्त करण्यात आले. आता ते नवी जबाबदारी म्हणजेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी घेण्यास तयार आहेत.
‘इंडियन कोऑपरेटिव्ह’शी बोलताना अतुल खिरवडकर म्हणाले की, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. कारण मी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होत आहे. या संघटनेला ‘अम्ब्रेला ऑर्गनायझेशन’ असे संबोधण्यात आले आहे.”
अतुल खिरवडकर हे ४३ वर्षांहून अधिक काळ बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. यामध्ये त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये १५ वर्षांचा आणि सहकारी बँकिंगमध्ये २८ वर्षांचा अनुभव आहे.
६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या आघाडीच्या मल्टी- स्टेट शेड्युल्ड कोऑपरेटिव्ह बँकेचा ते गेल्या १४ वर्षांपासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कारभार पाहत आहेत. नियामक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ते या क्षेत्राला मदत करत आहेत. बहुराज्य सहकारी कायद्यातील प्रस्तावित सुधारणांबाबत त्यांचे मत मांडण्यासाठी ते नुकतेच संयुक्त संसदीय समितीसमोर हजर झाले होते.
हे ही वाचा:
‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते
काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार
सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका
अतुल खिरवडकर ही व्यक्ती सहकार क्षेत्रातील एक नामांकित तज्ज्ञ असून त्यांचा या क्षेत्रामध्ये गाडा अभ्यास आहे. या पदाला न्याय देण्याची पूर्ण क्षमता त्यांच्यामध्ये आहे. केंद्र सरकारने नियुक्ती केलेल्या या पदाला न्याय देण्याची पूर्ण क्षमता त्यांच्यामध्ये आहे, असे मत अंबरनाथ जयहिंद सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे संचालक संजय ढवळीकर यांनी व्यक्त केले.