असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांना पेन्शनची सुविधा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने २०१५ मध्ये अटल पेन्शन याेजना सुरू केली हाेती. या याेजनेत आता केंद्र सरकारने माेठा बदल केला आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता प्राप्तिकर भरणारे करदाते या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. सरकारने जारी केलेला हा आदेश १ ऑक्टोबर २०२२ पासून लागू होणार आ हे. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शनचा लाभ घेता येणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार नवीन तरतुदीनुसार, जर एखादी व्यक्ती १ ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर या योजनेत सामील झाली असेल आणि नवीन नियम लागू होण्याच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ती भरत असल्याचे आढळले तर त्याचे खाते त्वरित बंद केले जाईल आणि तोपर्यंत जमा केलेली पेन्शनची रक्कम परत केली जाईल. त्याचाही सरकार वेळोवेळी आढावा घेणार आहे. अटल पेन्शन योजना ही पेन्शन नियामक प्राधिकरणाद्वारे चालवली जाते. ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु त्यानंतर १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिकाला यामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, आता सरकारने या योजनेत हा नवा बदल केला आहे.
सध्याच्या नियमांनुसार, जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर, १८-४० वयोगटातील आणि कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे बचत खाते असेल, तर तुम्ही या याेजनेसाठी अर्ज करू शकता. अटल पेन्शन योजनेवरील पेन्शनशी संबंधित सर्व लाभांसाठी भारत सरकारची हमी उपलब्ध आहे. बँक खातेधारक किंवा पोस्ट ऑफिस खातेधारक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत ठेवीदारांना ६० वर्षानंतर पेन्शन मिळू लागते. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
हे ही वाचा:
‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी
धनुष्यबाणाच्या लढाईची कागदपत्रे सादर करा
उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा कट लष्कराने उधळला
परदेशात नोकरी लावतो सांगून ‘त्या’ गंडवत होत्या
असे सहभागी व्हा
अटल पेन्शन योजना ही अशी सरकारी योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. योजनेंतर्गत, किमान मासिक १,०००, २,००० , ३,०००, ४,०००आणि कमाल ५,००० रुपये मिळू शकतात. जर तुम्हाला यामध्ये नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे फक्त एकच अटल पेन्शन खाते असू शकते हे लक्षात ठेवा.
जितक्या लवकर गुंतवणूक तितका लवकर फायदा
या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली तर वयाच्या ६० व्या वर्षी त्याला दरमहा ५,००० रुपये मासिक पेन्शनसाठी फक्त २१० रुपये प्रति महिना जमा करावे लागतील.
योजनेतील सदस्यांची संख्या वाढणार
या नवीन बदलाचा फायदा म्हणजे ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे किंवा जे प्राप्तिकराच्या टप्प्यात येत नाहीत त्यांना या याेजनेचा लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता मिळेल. तसेच ते या पेन्शन याेजनेचा लाभ घेऊ शकतील आणि पर्यायाने या याेजनेतील सदस्यांची संख्या वाढेल.