अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

अर्थसंकल्पानंतर आनंदी असल्याचे आनंद महिंद्रा यांचे मत

अर्थसंकल्पावर महिंद्राना आनंद!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा अखेरचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणूक जवळ असल्यामुळे हा अंतरिम अर्थसंकल्प होता. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पावर महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर विविध विषयांवर व्यक्त होत असतात. अशातच त्यांनी अर्थसंकल्पाविषयी त्यांचे मत मांडले आहे.

आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स अकाऊंवर पोस्ट करून अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. “अर्थसंकल्प सादर होत असताना त्याच्याभोवती अनेक नाट्यमय घडामोडी घडताना अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. मात्र, यावेळी तसा नाटकीपणा घडला नाही. धोरणांची घोषणा होत असताना लोकांच्या आशा पल्लवीत होताना पाहिल्या, मात्र कधी कधी पूर्ण न होणारे आश्वासने दिली गेल्याचेही पाहिले. धोरणांची घोषणा करण्यासाठी अर्थसंकल्प नसतो. अशा घोषणा वर्षभरात कधीही करता येऊ शकतात,” अशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली. तसेच अर्थसंकल्पानंतर आनंदी असल्याचे आनंद महिंद्रा म्हणाले.

त्यांनी अर्थसंकल्पाविषयी चार मुद्देही मांडले आहेत. पहिला मुद्दा असा की, अर्थसंकल्प थोडक्यात सादर करण्यात आला. भाषण अजिबात लांबविले गेले नाही. भाषण संक्षिप्त ठेवल्याबद्दल स्वागत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे निवडणुकीपूर्वीच्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात येत असतात. मात्र, या अर्थसंकल्पात अशा घोषणा करण्यात आल्या नाहीत. याचे स्वागत आणि हीच बाब पुढेही कायम राहील, अशी आशा आहे. तिसरा मुद्दा हा की, राजकोषीय तुटीचे लक्ष्य अपेक्षेपेक्षा चांगले आहे. सरकारच्या दूरदर्शी धोरणाचा हा विजय आहे. तर, चौथा मुद्दा म्हणजे कर आणि शुल्काबाबत कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे बाजारात जेवढी स्थिरता राहील, तितका व्यवसायांना लाभ होईल.

हे ही वाचा:

वर्षभरात काही सिद्ध न झाल्यास जप्त केली मालमत्ता परत करा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

मराठा आरक्षण सर्वेक्षणाला राज्य सरकारकडून मुदतवाढ नाही!

युक्रेनने बुडवली रशियाची युद्धनौका

या अर्थसंकल्पानंतर आपण कामावर परत जाण्यावर आणि अधिक समृद्ध भारताकडे जाणारा ‘सेतू’ पार करताना आपल्या योजना कार्यक्षमतेने अंमलात आणण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version