आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

जगातील टॉप टेन श्रीमंतांच्या यादीत येणारे आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना सर्व क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवायचा आहे. याच दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. अदानी विल्मारपासून ते अदानी पॉवरपर्यंत त्यांच्या सर्वच कंपन्या तेजीत आहेत. नुकतच आता अदानी ग्रुपने सिमेंट क्षेत्रात पाऊल टाकले आहे. भारतातील लोकप्रिय सिमेंट कंपन्या अंबुजा आणि एसीसीला ताब्यात घेण्यासाठी अदानी ग्रुपने साडेदहा अब्ज डॉलरचा करार केला आहे. त्यामुळे आता अल्ट्राटेक सिमेंटनंतर अदानी ग्रुप देशातील सर्वात मोठा दुसरा सिमेंट उत्पादक बनला आहे.

होलसिम ग्रुपकडे अंबुजा सिमेंटची ६३ पूर्णांक १९ टक्के भागीदारी होती जामध्ये एसीसी सिमेंटचाही समावेश होता. कारण एसीसी सिमेंट ही अंबुजा सिमेंटचीच उपकंपनी आहे. होलसिम ही एक स्विस-आधारित जागतिक बांधकाम साहित्य उत्पादक कंपनी असून या कंपनीला जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानलं जात. होलसिम कंपनीने अंदाजे १७ वर्षांपूर्वी भारतात आपला कारभार सुरु केला होता. अदानी ग्रुपने होलसिमकडून अंबुजा सिमेंटचे प्रति शेअर ३८५ रुपयाप्रमाणे ५१६ दशलक्ष शेअर्स खरेदी केलेत तर एसीसी सिमेंटचे प्रति शेअर २ हजार ३०० दराने जवळपास ४९ दशलक्ष शेअर्स खरेदी केलेत. ह्या कराराची एकूण रक्कम साडे दहा अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ८२ हजार करोड आहे. अंबुजा आणि एसीसी सिमेंट या दोन्ही कंपनीचे पूर्ण भारतातील वार्षिक उत्पादन ७० दशलक्ष मेट्रिक टन आहे त्यामुळे आता आदित्य बिर्ला यांच्या अल्ट्राटेक्ट सिमेंट नंतर ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दुसरी सिमेंट कंपनी बनली आहे. एसीसी सिमेंटचा कारभार १९३६ साली सुरु झालेला तर अंबुजा सिमेंटची स्थापना १९८३ मध्ये नरोतम सेखसारिया आणि सुरेश नेओटिया या दोन व्यापाऱ्यांनी केली होती. अदानी ग्रुपने केलेला हा करार बांधकाम क्षेत्रात झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचे म्हटलं जात आहे.

या क्षेत्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. सिमेंट क्षेत्रात अदानी ग्रुप येण्याचे कारण म्हणजे भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सिमेंट बाजारपेठ आहे आणि तरीही त्या तुलनेत जागतिक सरासरी दरडोई भारताच्या सिमेंटचा वापर अर्ध्याहून कमी होतोय. हेच गणित गौतम अदानी यांना बदलायच आहे. सध्या अंबुजा आणि एसीसी सिमेंटचे वार्षिक उत्पन्न ७० दशलक्ष मेट्रिक टन असून अदानी ग्रुपला पुढील पाच वर्षात हेच उत्पादन दुपट्ट करायचे आहे. म्हणजेच पाच वर्षात अदानी ग्रुपला १४० दशलक्ष मेट्रिक टन सिमेंटचे उत्पादन करायच आहे.

याच दुसरं कारण म्हणजे अदानी ग्रुपला म्हणजेच गौतम अदानी यांना सर्व क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवायचा आहे. सध्या अदानी ग्रुपकडे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा त्यामध्ये विमानतळ, बंदरे, पॉवर प्लांट, लॉजिस्टिक्स आणि अश्या बऱ्याच यासारख्या क्षेत्रांमध्ये त्याचे नाव आहे. आणि या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांची उपस्थिती सिद्ध करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सिमेंट उत्पदनात अदानी समूहाने पाऊल टाकले आहे.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

शिवराज सरकारने टिकवले ओबीसी आरक्षण

आता सिमेंट क्षेत्रात ‘अदानी पॉवर’

अजून एक महत्वाचं कारण म्हणजे, सध्या भारतात सरकारच्या अनेक योजना सुरु आहेत. या योजनांमध्ये १०० स्मार्ट शहरे, २०० नवीन विमानतळे याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेचा भाग म्हणून सर्वांसाठी घरे, रस्ते अश्या अनेक सरकारच्या योजना सुरु आहेत. या यासाठी सिमेंट आवश्यक आहे. आणि भारत हा एक विकसनशील देश असल्याने सिमेंटची मागणी ही वाढतच राहणार त्यामुळे या क्षेत्रात येणं हे अदानी ग्रुपचं मोठं पाऊल आहे. हा करार होताच १६ मे रोजी अंबुजा सिमेंटचे शेअर्स ५ टक्क्यांनी तर एसीसी सिमेंटचे शेअर्स जवळपास ८ टक्क्यांनी वाढले. अदानी ग्रुपची सिमेंट क्षेत्रात धमाकेदार एंट्री अदानी ग्रुपला किती फायदा देईल हे येणाऱ्या काळात कळेल.

Exit mobile version