अदानीला स्वतंत्र जेट्टीची परवानगी

अदानीला स्वतंत्र जेट्टीची परवानगी

रायगड जिल्ह्यातील अदानी समुहाच्या सिमेंट कारखान्याला स्वतंत्र जेट्टी बांधण्याची परवानगी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी (एम.सी.झेड.एम.ए) कडून मिळाली आहे. दिनांक ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अदानी समुहाचा अलिबाग तालुक्यात शहाबाज येथे सिमेंटचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी अदानी समुहाकडून कॅप्टीव्ह जेट्टी, कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्ता बांधकाम करण्याची परवानगी मागण्यात आली होती. हा रस्ता अंबा नदीवरून अदानीच्या जेट्टीकडे येणार आहे. सुरूवातीला शहाबाग येथे मोठ्या प्रमाणात खारफुटीची झाडे असल्याने दुसरी जागा निवडण्याचे सुचविण्यात आले होते. नवी जेट्टी नौका किनाऱ्यावर लागण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधांनी युक्त असणार आहे.

समुद्र किनाऱ्यावरील दोन हेक्टर जागा या जेट्टीच्या बांधकामासाठी निवडण्यात आली आहे तर कन्वेयर कॉरिडॉर आणि रस्त्यासाठी नदी काठावरील दिड हेक्टर जागेचा विचार करण्यात आला आहे. नव्या जेट्टीवर कोरडा माल उतरवला जाणार आहे. हा माल गुजरातवरून छोट्या पुरवठादार नौकांच्या मार्फत शहाबाज येथे आणला जाईल.

या बांधकामासाठी सुमारे १५० खारफुटीची झाडे तोडली जातील असा प्राथमिक अंदाज आहे. बांधकामासाठी पर्यावरणप्रेमी तंत्रज्ञान वापरले जाणार असल्याचे समजते. तोडल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात १० खारफुटीची झाडे लावली जाणार आहेत.

मुंबई मिररमध्ये याबाबत सविस्तर वृत्तांत प्रसृत झाला होता. अदानी समुहाकडून मुंबई मिररच्या फोन अथवा इमेलला कोणताही प्रतिसाद, छापले जाईपर्यंत प्राप्त झाला नाही.

(मुंबई मिररमधून साभार)

Exit mobile version