अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर सातत्याने भर दिला. रस्ते, राज्य महामार्गांपासून ते राष्ट्रीय महामार्गांच्या उभारणीवर गेल्या ९ वर्षांमध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. परिणामी देशभरात रस्त्यांचे भक्कम जाळे विणल्या गेले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या नऊ वर्षांमध्ये देशभरातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी जवळपास ५० हजार किलोमीटरपर्यंत वाढली आहे. मोदी सरकारच्या आधीच्या काळात देशात फक्त ९७ हजार ८३० किलोमीटर एकूण लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. मार्च २०२३ मध्ये राष्ट्रीय महामार्गांची लांबी वाढून १ लाख ४५ हजार १५५ किमी इतकी झाली आहे.
आकडेवारीनुसार २०१४-१४ या काळात दररोज १२.१ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले होते. २०२१-२२ मध्ये हाच वेग वाढून रोज २८.६ किमीचे रस्ते बांधण्यात आले. रस्ते वाहतूक हा केवळ आर्थिक विकासाचा आधार नसून सामाजिक विकास, संरक्षण आणि जीवनातील मूलभूत गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी रस्त्यांचे जाळे विणणे महत्वाचे ठरते.
एका अहवालानुसार, दरवर्षी सुमारे ८५ टक्के प्रवासी आणि ७० टक्के मालवाहतूक रस्त्यावरून होते. यावरून महामार्गाचे महत्त्व लक्षात येते. भारतात सुमारे ६३.७३लाख किमीचे रस्त्यांचे जाळे असून जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे जाळे असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या नऊ वर्षांत, सरकारने राष्ट्रीय महामार्गाच्या पायाभूत सुविधांची क्षमता वाढवण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. भारतमाला प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भारतातील सर्वात मोठा १,३८६ किलोमीटर लांबीचा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग जलद गतीने बांधला जात आहे. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा दिल्ली-दौसा-लालसोट विभाग राष्ट्राला समर्पित केला. यापूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षात सर्वाधिक वेगाने रस्ते बनवण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. या आर्थिक वर्षात १३,२९८ किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले. याचा अर्थ असा की, आढावा कालावधीत कालावधीत दररोज ३६.४ किमी रस्ते बांधण्यात आले.
हे ही वाचा:
साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप
आयसीसीने सांगितल्या सचिनच्या कारकीर्दीतल्या त्या १० आठवणी
वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!
विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !
लवकरच नवा विक्रम होणार आहे
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात रस्ते बांधणीचे अंतर्गत लक्ष्य निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षात दररोज सरासरी ४५ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.. या वेगाने रस्ते तयार झाले तर एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत देशात १६ हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते तयार होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.