केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले की हा सर्वसामान्य नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. यंदाचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प हा १४० कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. सामान्य नागरिक विकसित भारताचे ध्येय पुढे नेणार आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल, वापर वाढेल आणि विकासालाही गती मिळेल. आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना मिळण्यासाठी नक्कीच फायदा होईल. या जनता जनार्दन अर्थसंकल्प, लोकांच्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन,” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान पुढे असेही म्हणाले की, सामान्यतः अर्थसंकल्पाचा भर सरकारचा खर्च कसा वाढेल यावर असतो, पण हा अर्थसंकल्प देशातील नागरिकांचा खिसा कसा भरेल, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशाचे नागरिक विकासात कसे सहभागी होतील यासाठीचा मजबूत पाया रचणारा आहे. यासोबतच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सुधारणांच्या दिशेने उचललेल्या महत्त्वाच्या पावलांचेही त्यांनी कौतुक केले आहे.
अणुऊर्जेतील गुंतवणुकीचा उल्लेख करून खासगी गुंतवणुकीबाबत बोलून खासगी क्षेत्राला चालना देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्रातील रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशात पर्यटनाला अधिक वाव आहे. प्रथमच देशातील ५० महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये महत्त्वाची पर्यटन हॉटेल्स उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान म्हणाले, आज देशाचा विकास आणि वारसाही हाच मंत्र घेऊन जात आहे. या अर्थसंकल्पातही यासाठी अत्यंत महत्त्वाची ठोस पावले उचलण्यात आली आहेत. एक कोटी हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी ज्ञान भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. तसेच, भारतीय ज्ञान परंपरेने प्रेरित राष्ट्रीय डिजिटल भांडार तयार केले जाईल. म्हणजे आपल्या पारंपरिक ज्ञानातून अमृत काढण्याचे काम केले जाईल.
हे ही वाचा :
देशाला आर्थिक महासत्ता, विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प!
आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प!
अर्थमंत्र्यांनी परिधान केलेल्या साडीतून झाला मधुबनी कलेचा सन्मान!
यंदाचा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम धनधान्य कृषी योजनेला कृषी क्षेत्रात नवीन क्रांतीचा आधार देणारी योजना म्हटले आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण ग्रामीण भागासाठी नव्या क्रांतीचा आधार ठरणार आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी या अर्थसंकल्पाबद्दल म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प केवळ वर्तमान गरजा लक्षात घेत नाही तर भविष्याची तयारी करण्यासही मदत करतो. सर्व नागरिकांचे या लोक अर्थसंकल्पाबद्दल अभिनंदन आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचेही अभिनंदन.