मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून सादर केला जात असताना यात शेतकरी, युवा वर्ग, महिलांना अधिक प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे.
अर्थसंकल्पात या वर्षी शेती आणि संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याअंतर्गत सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार आहे. तसेच नैसर्गिक शेती करण्याला सरकारकडून प्राधान्य दिले जाणार आहे. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. ३२ फळे आणि भाज्यांच्या १०९ जाती वितरीत केल्या जाणार आहेत.
कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा
- शेती व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद
- नैसर्गिक शेतीला प्राधान्य
- कृषी उत्पादन वाढवण्यावर भर
- शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
- शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार
- सोयाबीन आणि सूर्यफूल बियांची साठवण वाढवणार
- डाळ आणि तेल बियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर