राज्याच्या राजकारणात सध्या ललित पाटील आणि पुण्यातील ड्रग्ज साठा हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पुण्यात महिन्याभरापूर्वी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळून तब्बल २ कोटी १४ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यानंतर ड्रग्स तस्कर ललित पाटील ससूनमधून फरार झाला होता. पुढे या प्रकरणी ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर हे चर्चेत आले होते. सध्या ललित पाटील हा अटकेत असून मुंबई उच्च न्यायालयाने डीन संजीव ठाकूर यांना चांगलाच दणका दिला आहे
ललित पाटील याला ससुन रुग्णालयात पंचतारांकित सुविधा देण्यात संजीव ठाकूर यांचा हात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतांना, मुंबई उच्च न्यायालयाने डीन संजीव ठाकूर यांना दणका देत मॅट कोर्टाचा निर्णय योग्य ठरवत संजीव ठाकूर यांची डीन पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता पुन्हा डॉ. विनायक काळे यांची या पदावर वर्णी लागणार आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील हा फरार झाल्यावर हे सर्व प्रकरण उघडकीस आले होते. ललित पाटील हा ससूनमध्ये राहून त्याचा ड्रग्स व्यवसाय चालवत असल्याचा आरोप आहे. शिवाय ललित पाटील याला ससून रुग्णालयात मिळणाऱ्या पंचतारांकित सुविधेवरुन देखील रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यात ससुनचे डीन ठाकूर यांचा हात असल्याचे आरोप करण्यात आले होते.
हे ही वाचा:
वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर
‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’
बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!
घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!
दरम्यान, या पूर्वीचे डिन डॉ. विनायक काळे यांना हटवून डॉ. संजीव ठाकूर यांची ससुनच्या डिनपदी निवड करण्यात आली होती. या विरोधात डॉ. विनायक काळे यांनी मॅटचे दार ठोठावले होते. सर्व प्रकरणाचा तपास करून मॅटने निकाल डॉ. विनायक काळे यांच्या बाजूने दिला होता. तसेच त्यांना ससूनच्या डीन पदावर कायम देखील केले होते. मात्र, या विरोधात डॉ. संजीव ठाकूर हे थेट उच्च न्यायालयात गेले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने देखील संजीव ठाकूर यांना दणका दिला आहे. न्यायालयाने मॅटचा निकाल कायम ठेवला आहे.