ऑस्ट्रेलियाचे फिझिओथेरपिस्ट निक जोन्स यांच्या सल्ल्यामुळे एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक खेळीची नोंद झाली. ही खेळी केली ग्लेन मॅक्सवेल याने. पायात गोळे आले असतानाही मॅक्सवेल याने मंगळवारी अफगाणिस्तानने ठेवलेले अवघड लक्ष्य पार केले.
मॅक्सवेल याच्या पायात गोळे आल्याने त्याला स्वतःलाच अफगाणिस्तानविरोधातील या सामन्यातून माघार घ्यायची होती. मॅक्सवेल याची प्रकृती पाहता कर्णधार पॅट कमिन्स याचीही काही तक्रार नव्हती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचे फिझिओथेरपिस्ट निक जोन्स यांना मात्र पक्के माहीत होते. मॅक्सवेल फक्त क्रीझवर उभा राहिला तरी कामगिरी फत्ते होऊ शकते. त्याला कमीत कमी धावा करायला लावायच्या आणि केवळ फटके मारायला लावायचे, असा सल्ला निक जोन्स यांनी दिला. आणि कमाल म्हणजे हा सल्ला स्वतः मॅक्सवेल आणि ऑस्ट्रेलिया संघासाठीदेखील हिट ठरला.
जोन्स हे गेल्या दोन वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग आहेत. मॅक्सवेल याची प्रकृती ड्रेसिंग रूममध्येच ढासळली होती. त्यामुळे त्याने मैदानावर उतरू नये, अशी सर्वांचीच इच्छा होती. मात्र या विरोधात उभे राहिले ते फिझिओथेरपिस्ट जोन्स. ‘आम्ही एक पराभूत झालेली लढाईच लढत होतो,’ असे जोन्स सांगतात. तर, स्वतः मॅक्सवेल या कामगिरीमुळे अचाट पडला आहे. ‘माझ्या तळपायात गोळे आले होते आणि त्याच्या वेदना या पायाच्या वरच्या भागापर्यंत जाणवत होत्या. मी जरा धावलो तर ते गोळे मांडीपर्यंत यायचे. माझ्या दोन्ही पायांच्या खालच्या भागात गोळे यायचे. मांड्यांमध्येही त्याच वेदना जाणवायच्या आणि जमिनीवर पडल्यावर पाठीतही वेदना व्हायच्या. जणू काही माझे सर्व शरीर ठणकत होते,’ असे मॅक्सवेल सांगतो.
‘यात असामान्य असे काही नाही,’ असे जोन्स सांगतात. ‘अनेक खेळाडूंना याचा त्रास होतो. मात्र जितके तुम्ही जास्त धावाल, तितके अधिक आणि सातत्याने पायात गोळे गोळे येतात. त्यामुळेच मी नियमितपणे बाहेर जाऊन त्याला शांत करत होतो. त्याचे बाकीचे सर्व काही ठीक आहे ना, ते पाहात होतो. त्याचे हृदयाचे ठोके व्यवस्थित आहे ना ते पाहात होतो,’ असे जोन्स स्पष्ट करतात.
जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयापासून ५५ धावा दूर होता, तेव्हा जोन्स यांना पुन्हा पाचारण करण्यात आले होते. ‘त्याला जणू गोळी लागलीय की काय, अशा अवस्थेत तो जमिनीवर अगदी मेल्यासारखा पडला होता. मी तिथे गेलो. त्याच्या शरीराच्या काही भागांत जोरदार वेदना होत होत्या. मी त्याला काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करायला सांगितले. मात्र मॅक्सवेल पूर्ण गळून गेला होता. ‘आता मी पुढे खेळू शकणार नाही. मला मैदानातून बाहेर जावेच लागेल,’ असे मॅक्सवेल म्हणाला.
हे ही वाचा:
मुलाला चिरडणाऱ्या गाडीचा पित्याने लावला आठ वर्षांनी शोध!
मानवी तस्करीप्रकरणी ४४ जणांना अटक!
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!
कर्णधार कमिन्सनेही त्याला उपचार घेऊन परत येण्यास सांगितले. बाकीच्या परिस्थितीत हे योग्यही होते. मात्र माझे मन वेगळेच सांगत होते. अशा बिकट परिस्थितीत तुम्ही जर त्या माणसाला बसवले, शांत केले तर तुम्ही त्याला पुन्हा खेळण्यासाठी तयार करू शकणार नाही, हे मला माहीत होते. अशा परिस्थितीत तुमचे संपूर्ण शरीरच काम करणे बंद करते. संपूर्ण शरीरात गोळे येतात आणि तुम्ही काहीच काम करू शकत नाही, असे जोन्स यांनी सांगितले. मग जोन्स यांनी शहाणपणाचा सल्ला दिला. तो कठीण परिस्थितीतून जात होता, हे खरे असले तरी त्यांनी मॅक्सवेल याचे मन वळवले.
‘ हे बघ. मैदानातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम पर्याय तुझ्याकडे आहे. तू आता जमिनीवर पडला आहेस. तुझ्या शरीराच्या अन्य भागांतही आता वेदना सुरू होतील. तुला तुझ्या पायावर उभे राहावे लागेल. तू काही स्ट्रेचिंगचे व्यायाम केलेस तर बरे वाटेल. मात्र जर तू तुझ्या पायावर उभा राहिलास आणि कमीत कमी धावलास तर तू येथे राहू शकतोस. मला वाटतं हाच आताच्या परिस्थितीत सर्वोत्तम पर्याय आहे,’ असे जोन्स यांनी मॅक्सवेलला सांगितले. आपल्याला मॅक्सवेलला क्रीझवर उभे ठेवावेच लागेल आणि त्याला खेळवावे लागेल, असे त्यांनी पॅटलाही पटवून दिले. सांगितले. मॅक्सवेलनेही हे ऐकले आणि त्याने क्रिकेटच्या इतिहासातील संस्मरणीय खेळी केली.