हिंसाचाराच्या आगीत होरपळणाऱ्या मणिपूरमध्ये सातत्याने सुरक्षा दलाला लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत तेंगनौपाल जिल्ह्यातील एक घटना समोर आली आहे. यामध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता गोळीबार सुरू असताना घुसून मणिपूरच्या पोलिसांचा जीव वाचवला. आसाम रायफल्सचे जवान मणिपूरच्या पोलिसांची सुटका करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यात मोरेह नावाचे एक ठिकाण आहे. म्यानमार सीमेनजीक असलेल्या या भागात ३१ ऑक्टोबर रोजी एका बंदुकधाऱ्याने पोलिस अधिकारी चिंगथम आनंद कुमार याची गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांच्या पथकाला मदतीसाठी येथे पाठवण्यात आले होते. मात्र कट्टरवाद्यांच्या टोळीने तेंगनौपाल जिल्ह्यात इम्फाळ-मोरेह राष्ट्रीय महामार्ग १०२वरून जाणाऱ्या पोलिसांच्या पथकावर डोंगरातून हल्ला केला. उंच ठिकाणांवरून होत असलेल्या गोळीबारात मणिपूर पोलिस अडकले होते.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
मात्र डोंगरावरून हा गोळीबार सुरू असतानाच आसाम राय़फल्सच्या जवानांचे एक पथक येथे पोहोचले. आसाम रायफल्सच्या जवानांनी हळूहळू आपली गाडी पोलिसांपर्यंत पोहोचवली आणि जखमी पोलिसांना एकेक करत गाडीत बसवले. गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसांन एकेक करून आसाम रायफल्सचे जवान गाडीत बसवत होते. ही गाडी नंतर थेट रुग्णालयात पोहोचली. तिथे पोलिसांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचाराचे लोण पसरले आहे. या घटनेला सहा महिने लोटूनही हिंसाचार कमी झालेला नाही. कुकी आणि मैतेई समाजात सातत्याने हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत.