कलेच्या माध्यमातून सामर्थ्यशाली समाजाची निर्मिती करणे हेच आमचे लक्ष्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केले आहे. ‘कला संकुल’ या संस्कार भारतीच्या नव्या कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कलेकडे बघण्याचा भारतीय दृष्टिकोन आणि पाश्चिमात्य दृष्टिकोन यातील भेद लोकांसमोर ठेवला.
शुक्रवार २ एप्रिल रोजी दिल्ली येथे संस्कार भारतीच्या ‘कला संकुल’ या नव्या मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष परेश रावल यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना सरसंघचालक म्हणाले,
“भारतीय कला या फक्त मनोरंजनाचे साधन नाहीत, तर मानावाच्या ठायी असलेल्या शिवत्वाची अभिव्यक्ती आहेत. पश्चिमी जगताने कलेच्या माध्यमातून फक्त मनोरंजनाची निवड केली. म्हणूनच त्यांची कला अपूर्ण आहे आणि ते सुखाच्या शोधात इतरत्र भटकत आहेत. सुखासाठी ते भारताकडे बघत आहेत. कारण भारत त्या मूलतत्वापर्यंत जातो जिथून सुखाच्या भावनेची उत्पत्ती होते. अशा समृद्ध कलांच्या माध्यमातून सामर्थ्यशाली समाजची निर्मिती करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
हे ही वाचा:
अबूधाबीच्या मंदिराच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होणार
‘गरिबांना रेशनचा तांदूळ दिला तोही विकून खाल्लात’- सुनिल देवधर
पहिली ते आठवी, विना परीक्षा सारेच पास
या कार्यक्रमाचा प्रारंभ सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि श्रीफळ वाढवून झाला. यावेळी सरसंघचालकांच्या हाताचे ठसे घेण्यात आले ज्याचे जतन संस्कार भारतीतर्फे केले जाणार आहे. या कार्यक्रमात मालिनी अवस्थी, अनूप जलोटा, अनवर अली खान, सुगंधा शर्मा, वसीफुद्दीन डागर, पंडित धर्मनाथ मिश्र आणि पंडित रामकुमार मिश्र अशा प्रसिद्ध कलाकारांनी मनमोहक असा ‘रागदेश’ प्रस्तुत केला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्री रामलाल, जेष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार, प्रज्ञा प्रवाहचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरण रिजिजू, राज्यसभा सदस्य पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंह, लोकगायिका पद्मविभूषण तीजनबाई आदी मान्यवर उपस्थित होते.