मराठा समाजाला सरकारकडून आता कुणबी दाखले देण्यास सुरुवात झाली आहे.मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखल देण्यास मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे.इतर समाज आरक्षणासाठी एक झाले तसे ओबीसी समाजाने एकत्र यावे असं आवाहन भुजबळांनी केले आहे. तसेच आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला दहशत माजावीच लागेल, असे देखील भुजबळ म्हणाले.मंत्री छगन भुजबळ आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना अंतरवाली सराटी फाट्यावर त्यांचे समर्थकांकडून स्वागत करण्यात आले.तेव्हा ते बोलत होते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नंतर राज्यसरकारने समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यास सुरुवात झाली.मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला देण्याची मागणी जरांगे करत आहेत.जरांगे यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे.अंतरवली सराटी येथे मंत्री भुजबळ बोलत असताना म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ७० वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले आहे. अजूनही आमचा समाज मागास आहे. ज्यांची नोंद आढळली असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नसल्याचे मंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींना मंगळसूत्र काढण्यास सांगितले
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!
छगन भुजबळ म्हणाले, आपल्यावर अन्याय होत असेल आणि दुःख झालं असेल तर आपल्याला कोणीही डॉक्टर औषध देणार नाही. त्यामुळे आपल्याला दहशत माजवावी लागेल. समोरच्या दरवाज्यातून एन्ट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण मोर्चे काढून एक आवाजात उभे राहावे लागेल नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल. तसेच १७ तारखेला अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा देखील त्यांनी आवाहन केले आहे.