एकीकडे पाकिस्तानने आपल्या देशातील अफगाणी नागरिकांना देशाबाहेर हाकलण्यासाठी तयारी केलेली असताना क्रिकेटच्या मैदानावर मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानला स्पर्धेबाहेर फेकण्याची तयारी केली आहे.
अफगाणिस्तानने वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात ७ विकेट्स आणि १११ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. या विजयामुळे अफगाणिस्तान वर्ल्डकपच्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानी पोहोचला आहे. तर पाकिस्तान मात्र सहाव्या स्थानी आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत.
या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पण त्यांना फार मोठी मजल मारता आली नाही. ४६.३ षटकांत १७९ धावाच नेदरलँड्सला करता आल्या. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने २८ धावा देत ३ बळी घेतले.तर नूर अहमदने २ बळींची नोंद केली. नेदरलँड्सच्या या धावसंख्येचा पाठलाग करणे मग अनुभवी अफगाणिस्तान संघासाठी फारसे कठीण गेले नाही. त्यांनी तीन फलंदाज गमावून ३१.३ षटकांतच निर्धारित लक्ष्य पार केले.
हे ही वाचा:
एल्विश यादव म्हणतो, रेव्ह पार्टी, ड्रग्ज संबंधीतील आरोप खोटे
बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!
पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाणानंतर पुणे विद्यापीठात राडा
अफगाणिस्तानतर्फे रेहमत शाहने ५२ तर कर्णधार शाहिदीने ५६ धावांची खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. ३ बाद १८१ धावा करत अफगाणिस्तानने हा सामना जिंकला. अफगाणिस्तानने या स्पर्धेत काही कमाल निकाल दिले आहेत. त्यांनी गतविजेत्या इंग्लंडला माती चारली असून श्रीलंका, पाकिस्तान आणि आता नेदरलँड्स अशा संघांवर विजय मिळविला आहे. भारत, बांगलादेश व न्यूझीलंडकडून मात्र त्यांना हार मानावी लागली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढती शिल्लक असून त्यात विजय मिळविणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे.
पहिल्या क्रमांकावर भारत असून त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत. भारताने आधीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांचे १२ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अफगाणिस्तान हे त्यानंतरच्या क्रमांकावर आहेत.