29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरसंपादकीयनीरो फिडेल वाजवायला देहरादूनला रवाना...

नीरो फिडेल वाजवायला देहरादूनला रवाना…

दारुबंदी, व्यसन मुक्तीवर भाषण ठोकणारा देशी दारुच्या गुत्यात सापडावा तसा प्रकार ठाकरेंच्या बाबतीत आहे

Google News Follow

Related

छत्तीसगढमध्ये पक्षाच्या प्रचार कार्यासाठी गेलेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे पक्ष प्रमुख ठाकरे सहपरिवार देहरादूनला सुटीसाठी रवाना झालेले आहेत. ठाकरेंच्या फूटपट्ट्या इतरांसाठी वेगळ्या असतात. दुसऱ्यावर प्रत्येक विषयांवर जीभ सैल सोडणारे ठाकरे स्वत:ला मात्र या फूटपट्ट्या लावताना दिसत नाहीत.

 

पक्षप्रमुख ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य आणि प्रवक्ते संजय राऊत हे बोलभांड नेते आहेत. घरी बसून बडबड करणे या पलिकडे त्यांचे कर्तृत्व नाही. लोकशाहीत विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु इतरांकडे बोटं दाखवताना आपली करणी काय, याकडे नेत्यांनी लक्ष द्यायला हवे. कारण तुम्हाला वाटत असले नसले तरी जनतेचे तुमच्याकडे लक्ष असते. ठाकरेंच्या पलटी मार नीतीची महाराष्ट्राच्या जनतेला एव्हाना सवय झाली असली तरी दरवेळी ठाकरे एक पाऊल पुढे जाऊन धक्का देतात.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनिमित्त छत्तीसगढचा दौरा केला. फडणवीस हे पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत. पक्ष जेव्हा हाक देतो तेव्हा त्यांना जाणे भाग असते. या दौऱ्यावर विश्वप्रवक्ते, शिउबाठाचे बोलबच्चन संजय राऊत यांनी टीका केली. ‘महाराष्ट्र पेटलेला आहे. परीस्थिती चिंताजनक आहे. राज्य जळत असताना फडणवीस प्रचार दौऱ्यासाठी कसे जाऊ शकतात?’ असा सवाल त्यांनी केला होता.

 

राऊतांना मालक सोडून बाकी इतरांच्या बाबतीतच प्रश्न पडतात. स्वत: नागडे असताना दुसऱ्याच्या उघडेपणाबाबत बोलण्याची ठाकरेंना खोड आहे. दारुबंदी आणि व्यसन मुक्तीवर भाषण ठोकणारा दुसऱ्या दिवशी देशी दारुच्या गुत्यात सापडावा तसा प्रकार ठाकरे आणि राऊत यांच्याबाबत सातत्याने होत असतो. महाराष्ट्र सध्या मराठा आंदोलनामुळे धुमसतो आहे. काल रात्री उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला २ जानेवारीची नवी डेडलाईन देऊन उपोषण मागे घेतले. त्या आधी परिस्थिती स्फोटक होती. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. जरांगेनी उपोषण मागे घेण्याच्या काही तास आधीच ठाकरे देहरादूनला रवाना झाले.

 

भाजपा नेते नीतेश राणे यांनी ठाकरेंवर जळजळीत टीका केली आहे. फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते. हवापालट करण्यासाठी नाही. ठाकरे हवापालट करण्यासाठी गेले आहेत. बद्रीनाथाच्या दर्शनाला गेले आहेत. पुढे ते केदारनाथला जातील अशीही शक्यता आहे. ठाकरेंचे मन इतकं मोठं आहे की त्यांना शेंडी जानव्याचे हिंदुत्व मान्य नसले तरी बद्रीनाथला शेंडी जानवेधारी पुजाऱ्यांनी केलेले स्वागत सत्कार त्यांनी मोठ्या मनाने स्वीकारला. त्यांनी दिलेला प्रसादही ग्रहण केला. प्रबोधनकारांच्या आत्म्याला काय वाटेल याची त्यांनी अजिबात चिंता केली नाही. कारण बद्रीनाथ काय किंवा महाराष्ट्रात शनी शिंगणापूर काय तिथे प्रबोधनकारांचे विचार उपयोगी नसतात. तिथे फक्त शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाला किंमत असते. जिथे जे फायद्याचे ते करायचे हा ठाकरेंचा बाणा आहे.

मविआच्या काळात जे काही ठाकरे परीवाराने पेरेले आहे ते आता उगवताना दिसते आहे. त्यामुळे आधी ठाकरे शनी शरण झाले. मे २०२३ मध्ये ते शनीशिंगणापूरात गेले. त्यांनी शनीच्या चौथऱ्यावर नतमस्तक होऊन तेलाचा अभिषेक केला. तेव्हाही प्रबोधनकारांच्या आत्म्याला पीडा झाली असणार. पण त्यांच्या आत्म्याला होणाऱ्या पीडेपेक्षा ठाकरेंना स्वत:च्या डोक्याला होणारा त्रास थांबवणे महत्वाचे वाटते आहे. संकटात ओढून ताणून आणलेल्या नास्तिकबाण्याच्या ठिकऱ्या उडत असतात.

 

शनी आराधना केली तरी साडे साती सुटेना, ती वाढतच चालली आहे. आता आदीत्य ठाकरे यांच्या मागे कायद्याची भुणभुण सुरू आहे. कठीण समय येता…फक्त ईश्वर कामासी येतो. बाकी राहुल वगैरे सगळे भ्रम असतात. ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील ४८ खासदारांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. माझ्याकडे देण्यासारखे काही नाही, असे ठाकरे वारंवार सांगत असतात. परंतु हे काही खरे नाही. त्यांच्याकडे देण्यासारखे रिकामटेकडे सल्ले भरपूर असतात. तसा सल्ला देऊन मराठा आरक्षणाबाबत इतक्या तीव्र भावना असलेले ठाकरे पेटता महाराष्ट्र सोडून थंड व्हायला बद्रीनाथला गेले. आपण केलेल्या राजीनाम्याच्या आवाहनाला आपल्या गटातील खासदारही प्रतिसाद देणार नाहीत, हे ठाकरेंना चांगले ठाऊक होते.

 

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधान परीषदेचा राजीनामा देण्याची घोषणा ठाकरेंनी केली होती. ती घोषणा तरी त्यांनी कुठे गंभीरपणे घेतली? ते जिथे स्वत:ला गंभीरपणे घेत नाहीत, तिथे इतर त्यांना गांभीर्याने का घेतील? आता फाजील प्रवक्ते काय स्पष्टीकरण देतील? बरा असो वाईट असो कायम मालकाच्या बाजूने बोलावे लागते. त्यामुळे ठाकरे महाराष्ट्राच्या भल्यासाठीच बद्रीनाथला गेले हे त्यांना महाराष्ट्राला पटवून द्यावे लागले. ठाकरेंची क्षमता काय हे आपल्या सगळ्यांना माहीती आहे. ती ठाकरेंनी अनेकदा सांगितली आहे. मी घरी बसून महाराष्ट्र चालवला हे ते अभिमानाने सांगतात. तसेच मी बद्रीनाथला जाऊन महाराष्ट्र शांत केला असेही ते सांगतील.

हे ही वाचा:

बनावट पोलीस अधिकाऱ्याने ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून केली हत्या!

पुण्यात ‘एनआयए’कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

डेहराडूनला निघून जाणं हीच ठाकरेंची मराठा आरक्षणाची काळजी का?

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

 

जळणाऱ्या महाराष्ट्राची धग ठाकरेंना लागण्याचे काही कारणच नाही, ते कायम मातोश्रीत कुलुपबंद असतात. पत्रकार परिषदा आणि सभांशिवाय ते घरातून बाहेर पडत नाहीत. बाहेर पडण्याचे तिसरे कारण म्हणजे भटकंती. फिरण्याचा मूड आला की ठाकरेंना जळणारा महाराष्ट्र दिसत नाही की बुडणारी मुंबई दिसत नाही. २६ जुलैला मुंबईत आलेला पूर सगळ्यांना आजही आठवत असेल. सगळी मुंबई तुंबली होती, त्यामुळे ठाकरेंनी मुक्काम वांद्र्याची पंचतारांकित हॉटेलात हलवला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी, हे तत्व त्यांनी तेव्हाही पाळले. पक्षप्रमुखांचे कुटुंब म्हणजे हम दो हमारे दो… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तेव्हाही मातोश्रीत थांबले होते. उद्धव ठाकरे जेव्हा मानेच्या शस्त्रक्रियेमुळे घरी होते. खाजवायचे कसे असा प्रश्नपडण्या इतपत ते पराधीन झाले होते, तेव्हा त्यांचे लाडके चिरंजीव परदेश दौऱ्यावर होते. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली परंपरा त्यांच्या घरात पुढेही पाळली जाणार हे नक्की. तूर्तास पेटलेल्या महाराष्ट्राला जय महाराष्ट्र करून ठाकरे परप्रांतातील गारव्याचा आनंद घेत आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा