इस्रायली सैन्यदलाने हमासविरोधातील त्यांच्या लढ्याची धार तीव्र केली असून त्यांनी गाझा शहराला घेराव घातला आहे. तरीही त्यांना भुयारांत लपून मारा करणाऱ्या पॅलिस्टिनी गटांचा सामना करावा लागत आहे. तर, युद्धाचा भडका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन शुक्रवारी पुन्हा इस्रायलच्या भेटीवर येत आहेत.
अरब नेत्यांनी इस्रायलला गाझामधील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. किमान सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी तरी हे हल्ले थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र इस्रायल आता थांबायला तयार नाही. त्यांनी आता संपूर्ण गाझा शहराला घेराव घातला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू युद्धावर ठाम आहेत. मात्र त्यांनी हे युद्ध मानवतावादी दृष्टिकोनातून थांबवावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही केले आहे. मात्र नेतान्याहू त्यासाठी तयार नसल्याने आता बायडेन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना इस्रायलला पाठवले असून ते नेतान्याहू यांना समजावण्याचा प्रयत्न करतील.
इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या या युद्धात आतापर्यंत नऊ हजार पॅलिस्टिनी नागरिकांना जीव गमवावा लागला असून सुमारे १४००हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले आहेत.इस्रायलच्या सैनिकांनी गाझा शहराला वेढा घातल्यानंतर नेतान्याहू यांनी देशवासीयांना संदेश दिला. ‘आता आपण युद्धाच्या अटीतटीच्या क्षणी पोहोचलो आहोत. आपल्याला चांगले यश मिळाले आहे आणि आपण गाझा शहराच्या बाहेरील भागातून निघालो आहोत. आपण पुढे मार्गक्रमण करत आहोत,’ असे त्यांनी जाहीर केले.
हे ही वाचा:
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर मागे; सरकारला २ जानेवारीपर्यंत दिला वेळ
मराठा आरक्षणामुळे संभाजीनगरातील आठ आगाराच्या एसटी बस जागेवरच!
बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले
गुरुवारी, इस्रायली सैनिकांनी विमानांतून गाझा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पत्रके वाटून निर्वाणीचा इशारा दिला. त्यांना शाती हे निर्वासितांचे शिबीर तातडीने सोडून देण्याचा इशारा देण्यात आला आहे. हमासला चिरडण्यासाठी सुरक्षा दल आता तीव्र हल्ले करणार आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. इस्रायली सैन्य दलाने पॅलिस्टिनी नागरिकांना वारंवार गाझा शहर सोडून देण्याचे आवाहन करूनही हजारो पॅलिस्टिनी अद्यापही उत्तर गाझामध्ये आहेत. त्यातील अनेकांनी सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्राने देऊ केलेल्या सुविधांचा आश्रय घेतला आहे. मात्र ही आश्रयस्थानेही आता सुरक्षित राहिलेली नाहीत. उत्तर गाझा आणि बुरेजीमधील संयुक्त राष्ट्राकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांचे आता निर्वासितांच्या शिबिरांत रूपांतर झाले आहे. मात्र इस्रायली सैनिकांनी येथे केलेल्या हल्ल्यात सुमारे २४ जण ठार झाले आहेत. बुरेजी येथे सुमारे ४६ हजार नागरिक राहतात.