केरळ येथे झालेल्या स्फोटांमागील खरे कारण आता समोर आले आहे. एर्नाकुलम येथे झालेल्या या स्फोटांमागे जी व्यक्ती होती तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती पोलिसांकडे शरण गेली पण त्याआधी व्हीडिओ करून त्या व्यक्तीने आपला गुन्हा आणि त्यामागील कारण स्पष्ट केले.
डॉमनिक मार्टिन असे या व्यक्तीचे नाव असून त्याने सदर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू असलेल्या जेहोवाह विटनेसेसच्या शिकवणीला विरोध दर्शविला. ही शिकवण आणि प्रार्थना थांबल्या पाहिजेत असे त्याचे म्हणणे आहे. देशासाठी ही विचारसरणी धोकादायक आहे असे त्याने म्हटले आहे. तरुणांच्या मनात ही विचारसरणी विष पेरण्याचे काम करत आहे, असेही त्याने म्हटले आहे.
हे ही वाचा:
भारत अभेद्य, इंग्लंडला नमवून सलग सहावा विजय
रोहित, शार्दुलचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे ‘ते’ स्वप्न झाले पूर्ण
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
फ्रिजमध्ये मिळाला मॉडेलचा मृतदेह!
मार्टिनने म्हटले आहे की, आपण जेहोवाहच्या विचारसरणीशी काही वर्षांपूर्वी संबंधित होतो. मीच हे स्फोट घडविले आहेत. मी याची जबाबदारी स्वीकारतो. हा व्हीडिओ सहा मिनिटांचा आहे. त्यात मार्टिन म्हणतो की, सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ही संघटना चुकीच्या मार्गाने जात आहे याची मला खात्री पटू लागली. त्यांची शिकवण ही देशविरोधी आहे, असे मला वाटू लागले. मी त्यांनी त्यात सुधारणा करण्याच्या सूचना अनेकवेळा केल्या. पण त्यांनी ते केले नाही. मार्टिन या व्हीडिओत म्हणतो की, श्रद्धा असायला हरकत नाही. पण यात शिकवण दिली जाते की, जगातील बाकी सगळे लोक नष्ट होतील फक्त ही विचारसरणी बाळगणारेच जिवंत राहतील. जे लोक ८५० कोटी लोकांच्या मृत्युचा विचार करत असतील त्यांचे काय करायचे? मला कोणताही मार्ग दिसला नाही. त्यामुळे मी त्या विचारसरणीला विरोध करण्यासाठी हा मार्ग पत्करला. त्यांनी सगळ्यांना हा संदेश दिला की, तुम्ही इतरांसोबत जाऊ नका. त्यांच्याकडून जेवण घेऊ नका. पण ही चुकीची विचारसरणी असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी असेही आवाहन केले की, प्रौढांनी मतदान करू नये आणि लष्करी सेवेतही जाऊ नये. असे भयंकर विचार हे लोक प्रसारित करत होते.
पोलिसांनीही मार्टिनने शरणागती पत्करल्याचे सांगितले. आता त्याची अधिक सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याने केलेल्या दाव्यामागील तथ्यही जाणून घेतले जाणार आहे. तरीही पोलिसांनी तोच या घटनेमागे आहे, यावर शिक्कामोर्तब केलेले नाही.