भारताचे कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांच्या अंगभूत क्रिकेटमधील कौशल्याला आकार देणारे त्यांचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचे कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. लाड यांना दहिसरमध्ये क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून जागा मंजूर झाली आहे.
दहिसर पश्चिमेकडील गोपिनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही अकादमी सुरू होणार आहे. या मैदानाची जागा सुमारे १२ हजार चौरस फूट असेल. ही क्रिकेट प्रशिक्षण अकादमी दोन महिन्यांत सुरू होईल. या अकादमीचे भूमिपूजन भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केले. ‘माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मला जमीन दिल्याबद्दल आभारी आहे. मी माझ्या अकादमीमध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्यांच्याकडून एक पैसाही घेणार नाही. सध्या लाड हे मुंबईच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आहेत. गेल्याच वर्षी त्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
हे ही वाचा:
भिवंडीतील तीन गोदामांना भीषण आग!
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
मरिन ड्राइव्हचे पारशी गेट जानेवारीला पुन्हा होणार स्थानापन्न
उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल
लाड यांनीच रोहित आणि शार्दुल यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य हेरले होते. तसेच, ते शिकवत असलेल्या बोरिवलीमधील स्वामी विवेकानंद शाळेमध्ये त्यांना पाठवण्यासाठी त्यांच्या पालकांचे मन वळवले होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रोहित शर्माकडे त्या वेळी महिन्याची २७५ रुपये शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. परंतु लाड यांनी त्यांच्या शाळेच्या संचालकांचे मन वळवले. तो भविष्यातील भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार असल्याचे सांगत त्याच्यासाठी शाळेत एक मोफत जागा मिळवून दिली होती. तर, शार्दुल दररोज पालघरहून बोरिवलीला येऊ शकत नसल्याने तो लाड यांच्याच घरी राहात असे.
६२ वर्षांच्या लाड यांच्या हाताखाली शिकलेली सुमारे ९२ मुले मुंबईसाठी विविध वयोगटांतून खेळतात. त्यांचा मुलगा सिद्धेश लाड, डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग, सुवेद पारकर आणि आतिफ अत्तरवाला ही त्यांतली काही नावे.