कोची येथील कलामसेरी येथे ख्रिश्चनांच्या एका प्रार्थनेच्या कार्यक्रमात स्फोट झाले आणि त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे तर २० जण या स्फोटांत जखमी झाले आहेत. केरळच्या कोची जिल्ह्यात हा प्रकार घडला.
झामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर येथे सकाळी ९.३० वाजता जेहोवाह विटनेस प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी २००० हजार लोक जमा झाले होते. त्याचवेळी हे स्फोट झाले. तीन दिवस चालणारी ही प्रार्थना सभा रविवारी समाप्त होणार होती. स्फोट घडल्यानंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. दहशवादविरोधी आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाची पथकेही घटनास्थळी रवाना करण्यात आली.
जखमींना कलामसेरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना खासगी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पिनराय विजयन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. विजयन यांनी म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यासंदर्भातील अधिक तपशील गोळा केला जात आहे. राज्याचे पोलिस महासंचालक घटनास्थळी रवाना झाले आहेत. आम्ही या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहोत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झालेले आहेत.
हे ही वाचा:
इस्रायलने जाहीर केले करा अथवा मरा! हमासविरोधातील लढाई दुसऱ्या टप्प्यांत
गाझामधील रुग्णालयच हमासच्या दहशतवादी कारवायांचे केंद्र
ऑस्ट्रेलियाला नमविण्याची नामी संधी न्यूझीलंडने ५ धावांनी गमावली
कतारमधील आठ भारतीयांना मृत्युदंड देऊ शकत नाही?
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक स्फोट एकामागून एक घडले. दरम्यान, रुग्णालयांना सज्ज राहण्यासाठी सांगण्यात आले आहे. जे डॉक्टर आणि कर्मचारी सुट्टीवर गेले आहेत त्यांनी ताबडतोब परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.