इस्रायलने गाझा पट्टीमध्ये जमीन, हवा आणि समुद्रमार्गाने हल्ल्यांची तीव्रता वाढवून हमासविरोधातील लढाईच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी शनिवारी रात्री जाहीर केले. त्यांनी राष्ट्राला संबोधित करताना ही इस्रायलच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगताना जमिनीवरील आक्रमणाच्या आधी हल्ला आणखी तीव्र होईल, असे त्यांनी सांगितले.
‘कधी कधी अशी परिस्थिती येते की, एका राष्ट्रासमोर केवळ दोनच पर्याय असतात. करा अथवा मरा. आता आपण या परीक्षेचा सामना करत आहोत. मला यात अजिबातच शंका नाही की, याचा शेवट काय असेल. आपण विजेते होऊ,’ असे ते म्हणाले. इंग्रजांविरोधातील लढाईमध्ये महात्मा गांधींनीही ‘करा अथवा मरा’ची घोषणा दिली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
इस्रायलकडून गाझा पट्टीमध्ये सुरू असलेला बॉम्बवर्षाव सर्वांत भीषण बॉम्बहल्ला असल्याची प्रतिक्रिया गाझामधील नागरिकांनी दिली आहे. या शहरातील बहुतेक संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे गाझामधील २३ लाख लोकांचा जगापासून संपर्क तुटला आहे. गाझा पट्टीमध्ये अनेक छोटमोठे रणगाडे हळूहळू पुढे पुढे येत असल्याचे दिसत आहे. काही रणगाडे सीमेपासून अगदी जवळ आहेत. लढाऊ विमानांनी हमासची अनेक भुयारे आणि भूमिगत बंकरांवर बॉम्बहल्ले केले आहेत.
हे ही वाचा:
चक्क ‘हमास’च्या दहशतवाद्याने मलप्पुरमच्या नागरिकांशी साधला संवाद
अपात्र झाले तरी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार!
उद्योगपती मुकेश अंबानी यांना २४ तासांत दुसरा धमकीचा मेल
केंद्रीय मंत्रिमंडळाकडूनही ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ नावाला प्राधान्य
७ ऑक्टोबरला हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यांच्या सुटकेसाठी देशभरातूनच सरकारवर दबाव वाढत आहे. या सर्व ओलिसांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. जमिनीवरील हल्ल्यांमुळे या मोहिमेला मदत मिळेल. मात्र मोहिमेची संवेदनशीलता आणि गोपनीयतेमुळे याबाबत अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
‘हा युद्धाचा दुसरा टप्पा आहे. ज्याचा उद्देश स्पष्ट आहे. हमासचे लष्कर आणि सरकारी तळांना उद्ध्वस्त करणे आणि ओलिसांना सुखरूप मायदेशी आणणे. आपल्या शूर सैनिकांचे एकच सर्वोच्च लक्ष्य आहे, मारेकरी शत्रूंना नष्ट करणे आणि जमिनीवरील स्वतःचे अस्तित्व सुनिश्चित करणे,’ असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले.