राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा व्हिडीओ भाजपाकडून शेअर करण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. विरोधकांकडून यावर टीका देखील करण्यात आली. अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे,” असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेची खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे असंही म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील. एकही दिवस कमी नसेल. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. एखादा व्हिडीओ पडला म्हणून विश्लेषणाची गरज नाही. आगामी निवडणुका या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होतील,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी
गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त
संरक्षण मंत्रालयाच्या प्रदर्शनात दिसली स्वदेशी शस्त्रांची ताकद
शशी थरूर म्हणाले, हमास हे दशहतवादी संघटन; डावे खवळले!
भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन” हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या जुन्या व्हिडीओमुळे नवे प्रश्न उपस्थित झाले होते. पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.