निवडणूक आयोगाने गुरुवारी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराला भेट दिली असता, त्यांनी दान केलेल्या लिफाफ्यात केवळ २१ रुपये होते, असा दावा प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांनी केला होता. या वक्तव्यावरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. प्रियांका यांना ३० ऑक्टोबरपर्यंत या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे.
भाजपने प्रियांका यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्याच्या एक दिवसानंतरच आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. प्रियांका यांनी २० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान खोटे दावे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक धार्मिक आस्थेचा उल्लेख केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर भाजपने प्रियांका यांच्याविरोधात कारवाई करावी, यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. प्रियांका यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा भाजपचा दावा आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, अर्जुन राम मेघवाल आणि अनिल बलुनी आणि ओम पुरी या भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून काँग्रेसच्या सरचिटणीस असणाऱ्या प्रियांका यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ‘प्रियांका गांधी या कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्या कायद्यावर विश्वास ठेवतात का? त्यांनी समाजात अशांतता पसरवण्यासाठी धार्मिक भावनांचा वापर करत आहेत. त्या असे करू शकत नाहीत, ‘ असे मेघवाल यांनी पत्रकारांना सांगितले.
हे ही वाचा:
जयंत पाटील एका घटनेमुळे आमच्या सोबत आले नाहीत, अन्यथा ते आमच्या सोबत असते!
इस्रायलच्या हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार; गाझामधील बळींची संख्या सात हजारांवर
‘अल जझिराचे युद्धावरील वृत्तांताचे प्रमाण कमी करा’
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
काय बोलल्या होत्या प्रियांका गांधी?
‘ तुम्ही पाहिलेच असेल, मी टीव्हीवरही पाहिले, माहीत नाही खरे आहे की खोटे. पंतप्रधान मोदी देवनारायण मंदिरात कदाचित गेले होते. त्यांनी दानपेटीत पाकीट टाकले. मी टीव्हीवर पाहिले, सहा महिन्यांनंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेले पाकीट उघडले असता, त्यात २१ रुपये होते. एकप्रकारे हेच होत आहे. देशात व्यासपीठावर घोषणा करताना कुठल्या कुठल्या प्रकारची पाकिटे दाखवली जातात. आणि जेव्हा तुम्ही ती पाकिटे उघडता, तेव्हा निवडणूक संपलेली असते,’ असे त्या म्हणाल्या होत्या.