विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर विरेंद्र सेहवागने केलेले ट्वीट व्हायरल झाले आहे. त्यात त्याने पाकिस्तानच्या संघाचा पराभव निश्चितच होता, असे म्हणून पाकच्या खेळाडूंची लाज काढली आहे.
या स्पर्धेत अफगाणिस्तान एकावर एक धक्के देत आहे. सुरुवातीला त्यांनी इंग्लंडच्या संघाला पराभूत केले आणि सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आपल्यावर वळवले. मात्र अफगाणिस्तानसारखा कमकुवत संघ पाकिस्तानला धूळ चारू शकेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. त्यामुळे पाकिस्तानला हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने पाकिस्तानची लाज काढणारे ट्वीट करून पाकिस्तानच्या जखमांवर मीठ चोळले आहे.
‘पाकिस्तानबद्दल आपण कधीच काही भाकीत करू शकत नाही. मात्र ज्या प्रकारे त्यांनी स्पर्धेतील पहिल्या पराभवाची जी घाणेरडी कारणे सांगितली, त्यावरूनच त्यांचा पराभव दिसत होता. पाकिस्तानने आपल्या उणिवा आणि कमकुवत दुव्यांवर लक्ष दिले नाही. अफगाणिस्तानसाठी हा किती अभिमानाचा क्षण आहे. ते कितीतरीवेळा पाकिस्तानविरुद्ध विजयाच्या समीप आले होते, मात्र त्यांनी यावेळी सीमा ओलांडलीच,’ असे ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केले आहे.
हे ही वाचा:
चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स
भारताचे माजी फिरकीपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन!
तृणमूल पक्षाचे महुआ मोइत्रा यांच्यावर कारवाईचे संकेत
११ वर्षांनंतर पुन्हा तेच उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा
पाकिस्तानवर विजय मिळवल्यामुळे अफगाणिस्तानच्या संघाने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गुणतक्त्यामध्ये १०व्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकिस्तानने या सामन्यात ५० षटकांत सात विकेट गमावून २८२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानने ४९ षटकांत दोन विकेट गमावून २८६ धावा केल्या. पाकिस्तानचा पुढचा सामना आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होईल. हा सामना २७ ऑक्टोबरला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये रंगणार आहे.