ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात रोज नव्याने माहिती समोर येत आहे. दरम्यान, नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रात ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटीलचा साथीदार आणि त्याचा ड्रायव्हर सचिन वाघ याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते, अशी धक्कदायक माहिती सचिन वाघच्या चौकशीतून उघडकीस आली. त्यानंतर मुंबई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. यावेळी पोलिसांच्या मदतीला रायगड येथील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले. मध्यरात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य सुरू आहे.
आतापर्यंत दोन गोण्या म्हणजेच सुमारे ५० किलो ड्रग्ज नदी पात्रात फेकल्याचे सचिन वाघ याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले आहे. नदीतील पाणी साधारण १५ ते २० फूट खोल असल्याने ड्रग्जचा साठा अद्याप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून १५ किलो एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हे ही वाचा:
चॅटजीपीटीने लिहिलं काही क्षणात गाणं; बँडने केला लाईव्ह परफॉर्मन्स
चेपॉकमध्ये अफगाणिस्तानने पाकिस्तानला चेपले
शेतजमिनीच्या वाटणीतून चुलत भावाची हत्या!
देशातील सहा टक्के नागरिक खटल्यांमध्ये गुंतलेले!
सध्या ललित पाटील आणि सचिन वाघ हे दोघेही २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहेत. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली होती.