हमासविरोधात अटीतटीची लढाई लढण्यासाठी इस्रायलने आता गाझावर जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी केली असताना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि अन्य पाश्चिमात्य देशांच्या प्रमुखांनी संयुक्त निवेदन जाहीर करत इस्रायलला स्वसंरक्षणासाठी हमासविरोधात लढण्याचा संपूर्ण हक्क असल्याचे नमूद केले आहे.
गाझा शहरात आता कधीही जमिनीवरून लढाईला सुरुवात होऊ शकते. त्यानुसार इस्रायली सुरक्षा दलाने हमासशासित गाझा पट्टी आणि दक्षिण लेबेनॉन भागात हल्ले तीव्र केले आहेत. तसेच, सिरिया आणि वेस्ट बँक येथेही हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने एक संयुक्त निवेदन जाहीर करून इस्रायलला स्वसंरक्षणासाठी हमास या दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि आम्ही त्याला जोरदार समर्थन देतो, असे स्पष्ट केले आहे. अर्थात त्यांनी नागरी हक्कांचे पालन करण्याची गरजही अधोरेखित केली आहे. या युद्धात आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन होता कामा नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
इस्रायलने हिझाबुल्लाह या दहशतवाद्यांचे प्राबल्य असलेल्या दक्षिण लेबॅनॉन भागांत रविवार रात्रीपासूनच हल्ले तीव्र केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी जमिनीवरील लढाईला सुरुवात करण्यापूर्वी सर्व वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक घेऊन लढाईच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. इस्रायलने गाझा पट्टीमधील जाबालिया निर्वासितांच्या छावणीजवळ केलेल्या हल्ल्यात ३० पॅलिस्टिनी नागरिक ठार तर, अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त अल-जझीरा यांनी दिले आहे. तसेच, इस्रायलचे सुरक्षा दल गाझामधील रुग्णालय परिसरात हल्ले करत असल्याचा दावाही पॅलिस्टिनी प्रसारमाध्यमांनी केला आहे.
हे ही वाचा:
नवाझ शरीफ यांच्या विमानात चोरी
पोलिसांच्या गाडीने चार जणांना उडवलं
गड आला; पण शतक हुकले, विराटची विक्रमाची संधी हिरावली
बावनकुळेंची नाही, शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी!
लेबॅनॉनमधील हिझाबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र आणि रॉकेट उडवण्याचा कट होता, त्यामुळे इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. यात एक हिझाबुल्लाह दहशतवादी मारला गेला आणि सीमेवरील तणावात वाढ झाली, असे सांगण्यात येत आहे.