इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युद्धाबाबत शनिवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्या मुद्द्यावरून सध्या इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान युद्ध सुरू आहे, त्यावरून भारतात कधीच भांडणे दिसली नाहीत. हिंदू धर्म सर्व संप्रदायांचा सन्मान करतो,’ असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
‘या देशात सर्व पंथ संप्रदायांचा आदर करणारा धर्म आहे. हा हिंदूंचा देश आहे. जो सर्वांना सांभाळतो, त्यालाच हिंदू म्हणतात. केवळ हिंदुस्तानच हे करतो. बाकी सर्व ठिकाणी तर लढाई होत आहे. तुम्ही युक्रेन-रशिया आणि हमास-इस्रायल युद्धाबाबत ऐकले असेलच,’ असे भागवत यावेळी म्हणाले.
‘आपल्या देशात यावरून कधीच लढाई झाली नाही. आपण कधी अशी लढाई लढली नाही. या मुद्द्यावर आपण कधीच कोणाशी भांडत नाही, म्हणूनच आपण हिंदू आहोत. असा हा हिंदूंचा देश आहे. या देशात असा एक धर्म, संस्कृती आहे जो सर्व संप्रदाय आणि आस्था यांचा सन्मान करतो. तो हिंदू धर्म आहे. तो हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण अन्य सर्व धर्मांचा अस्वीकार करतो,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हे ही वाचा:
पुण्यात विमान कोसळलं, तीन जण जखमी!
बॉलिवूड अभिनेता दलीप ताहिलला दोन महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा!
मसूद अझहरचा निकटवर्तीय दहशतवादी दाऊद मलिकला ठोकले!
आईमुळे बलात्कारी पुत्राला २० वर्षे सक्तमजुरी!
‘असे केवळ भारतातच होते’
‘जेव्हा आपण हिंदूंबाबत बोलता, तेव्हा आपल्याला हे सांगायची गरज नाही की आपण मुसलमानांचेही रक्षण केले होते. केवळ हिंदू धर्मच सर्व धर्मांचे संरक्षण करतो. केवळ भारतच असा देश आहे की जो प्रत्येक धर्माला मानतो. दुसऱ्या कोणीही हे केलेले नाही,’ असे भागवत यांनी सांगितले. ‘आज प्रत्येक ठिकाणी संघर्ष सुरू आहे. तुम्ही युक्रेन आणि हमास-इस्रायलबाबत ऐकलेच असेल. आपल्या देशात या मुद्द्यांवर कधीच युद्ध झालेले नाही. शिवाजी महाराजांच्या काळातही अशाच प्रकारचे आक्रमण झाले, मात्र या मुद्द्यावर आपण कधीच कोणाशी लढाई केली नाही. म्हणूनच आपण हिंदू आहोत,’ असे ते म्हणाले.