भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली खरी, परंतु त्यातील घटकपक्षांमधील वाद आतापासूनच चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले कमलनाथ यांनी समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यातील शाब्दिक द्वंद्व वाढले आहे.
कमलनाथ यांनी इंडिया आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी असल्याचा दावा केल्यानंतर अखिलेश यांनी कमलनाथ यांच्यावर ते आघाडीबाबत गोंधळ निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर ‘त्या अखिलेश-विखिलेश’ना सोडून द्या,’ असे भाष्य केल्याने दोन्ही पक्षांमधील कलह समोर आला आहे.
अखिलेश यादव यांनी शाहजहानपूर येथे बोलताना काँग्रेसचे मध्य प्रदेशातील वर्तन हे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असा आरोप केला. ‘अशा प्रकारे काँग्रेस पक्ष समाजवादी पक्षाला मध्य प्रदेशात वागमूक देणार असेल, तर त्यांच्यासोबत कोण राहील?,’ असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी कमलनाथ यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी केली.‘भाजप हा खूप मोठा पक्ष आहे. भाजप एक सुनियोजित पक्ष आहे. अशा प्रकारच्या तगड्या विरोधी पक्षाशी लढा देताना कोणत्याही प्रकारे गोंधळ असता कामा नये. अशा प्रकारच्या गोंधळामुळे भाजप वरचढ ठरू शकते. भाजपचा पराभव करता येणार नाही,’ असे अखिलेश म्हणाले.
हे ही वाचा:
भारताची गगनभरारी; ‘गगनयान’ प्रो मॉड्यूलची चाचणी यशस्वी
वॉर्नर, मार्शच्या शतकांनी ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला विजय
राजनैतिक अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ट्रुडो पुन्हा बरळले
फडणवीसांनी बुरखा नव्हे; कपडेच फाडले!
या सर्व वादावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया शिनाते यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारचे वाद कुटुंबात होतच असतात आणि ‘इंडिया’ हे कुटुंब आहे, समाजवादी नेतृत्व काही गोष्टींबाबत नाराज आहे, हे आम्हाला माहीत असल्याचा दावा त्यांनी केला. ‘काँग्रेस समाजवादी पक्षाशी विविध स्तरांवर संपर्कात असून हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असे त्या म्हणाल्या. तर, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केल्याशिवाय भाजपला उखडून टाकणे शक्य नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल यादव यांनी केला.