जवळपास एक वर्षाहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आणि आता इस्रायल आणि हमासविरोधात सुरू झालेल्या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण दाटून आले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राला संबोधून भाषण केले. त्यात त्यांनी ‘हमास आणि रशिया हे दोघेही लोकशाहीचा निःपात करण्याच्या तयारीत आहेत,’ असे वक्तव्य केले.
‘हमास आणि पुतिन यांचा दहशतवाद आणि जुलूम वेगवेगळ्या धोक्यांचे प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांचा उद्देश मात्र एकच आहे, शेजारील देशांमधून लोकशाहीचा संपूर्णपणे निःपात करणे,’ असे प्रतिपादन बायडेन यांनी केले. ही आंतरराष्ट्रीय आक्रमकता राहिल्यास जगाच्या इतर भागांतही संघर्ष आणि अराजकता पसरू शकते, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, युक्रेन आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करावा, अशी विनंती आपण अमेरिकी काँग्रेसला करू, असे आश्वासनही बायडेन यांनी यावेळी दिले. एक जागतिक नेता म्हणून अमेरिकेच्या भविष्यासाठीची ही गुंतवणूक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
हे ही वाचा:
कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!
विषप्रयोग करून २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
गाझामध्ये लवकरच जमिनीवरील लढाई; हमासचा उच्च नौदल अधिकारी ठार
‘महुआ यांनी लॉग-इन, पासवर्ड शेअर केले, मोदींची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न’
‘ही एक स्मार्ट गुंतवणूक आहे, जी पिढ्यानपिढ्या अमेरिकेच्या सुरक्षेसाठी लाभदायक ठरणार आहे,’ असेही ते म्हणाले. ‘अमेरिकी नेतृत्व हे जगाला एकत्र ठेवते. अमेरिकी नागरिकांची एकजूटच आपल्याला अमेरिका म्हणून एक सुरक्षित ओळख देते. अमेरिकी मूल्यांमुळेच अनेक राष्ट्रांना आपल्यासोबत काम करायचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी जो बायडेन यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना सर्वतोपरी मानवतावादी मदत देण्याचे आवाहन इस्रायलच्या भेटीदरम्यान पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांना केले होते. ‘हमासविरोधात चिघळलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विस्थापित झालेल्या गाझामधील नागरिकांचे दुःख दूर करण्यासाठी मानवतावादी मदतीस परवानगी न दिल्यास इस्रायली नेत्यांना जबाबदार धरले जाईल,’ असा स्पष्ट इशारा जो बायडेन यांनी दिला आहे. तसे त्यांनी इस्रायलभेटीवरून परतल्यानंतर पत्रकारांना सांगितले होते.