माझगाव येथील १०० वर्षे जुन्या मेघजी बिल्डिंग को. ऑप. सोसायटीच्या सचिवावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. या इमारतीची सध्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू असून सोसायटीच्या कमिटी मेंबरने नुकताच एका बांधकाम व्यावसायिकाशी केलेला पुनर्विकासाचा करार रद्द केला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने दोन संशयितांना पकडले आहे. या जखमी सेक्रेटरीचे नाव धर्मेश सोलंकी (५०) असे आहे. त्याने या हल्ल्यामागे एका राजकीय नेत्याचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र एफआयआरमध्ये या राजकीय नेत्याचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. सेक्रेटरीवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘ माझ्यावर ६ ऑक्टोबर रोजी दिवसाढवळ्या हल्ला झाला. माझगावमधील जीएसटी भवनासमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी त्याने एका राजकीय नेत्याचे नाव घेतले. मी स्थानिक पोलिसांना त्या राजकीय नेत्याचे नाव सांगूनही पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचे नाव नमूद केलेले नाही, असे सोलंकी यांनी रुग्णालयात उपचार घेत असतानाच सांगितले.
सोलंकी यांनी पोलिस उपायुक्तांना या प्रकरणासंदर्भात विस्तृत माहिती दिली आहे. त्यांच्या १०० वर्षे जुन्या इमारतीच्या तीन विंगच्या पुनर्विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेमध्ये हा स्थानिक राजकीय नेता कशाप्रकारे सहभागी झाला, याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा गुन्हे शाखेला वर्ग करावा, अशी मागणी सोलंकी यांनी केली आहे.
हे ही वाचा:
ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या कार्यक्रमावर २०२५पर्यंत शिक्कामोर्तब!
द. आफ्रिकेचा केशव महाराज ‘ओम’ लिहिलेल्या बॅटने होता खेळत; फोटो व्हायरल
पाकिस्तानचा रडीचा डाव; अहमदाबादच्या प्रेक्षकांवर आरोप
बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?
‘आम्ही याआधी निविदा प्रक्रियेद्वारे इमारतीच्या विकासाचे काम मालाडमध्ये कार्यालय असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला दिले होते. मात्र त्याने पुनर्विकासाच्या कामाला उशीर केला. तसेच, त्याने सोसायटीला एक कोटी रुपयेही दिले नाहीत. त्यानंतर आम्हाला माहिती कळली की, एका राजकीय नेत्याच्या नातेवाइकाची या बिल्डरच्या ग्रुपमध्ये भागीदारी आहे. तसेच, आम्हाला काही अनियमितताही आढळली, ज्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हते. तरीही त्याच बांधकाम व्यावसायिकाकडून काम करवून घेण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र जूनमध्ये आमच्या ७७ सदस्यांनी सोसायटीच्या सर्वसाधारण बैठकीत हा करार रद्द केला,’ अशी माहिती सोलंकी यांनी दिली.
‘हल्ला झाल्याच्या ४८ तासांच्या आत आम्ही दोघा हल्लेखोरांना अटक केली आहे. तसेच, लवकरच तिसऱ्या व्यक्तीलाही अटक केली जाईल. या हल्ल्याचा इमारतीच्या पुनर्विकासाशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे,’ असे भायखळा पोलिस ठाण्याचे नंदकिशोर गोपाळे यांनी सांगितले.